For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑपरेशन कमळसाठी 100 कोटींचे आमिष

06:06 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑपरेशन कमळसाठी 100 कोटींचे आमिष
Advertisement

मंड्याचे काँग्रेस आमदार रविकुमार गणिग यांचा नवा राजकीय बॉम्ब : राज्यात पुन्हा ऑपरेशन कमळ चर्चेत

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

भाजप-निजदने राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठीच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली आहे, असा काँग्रेस नेत्यांनी आरोप करत असतानाच राज्यात ‘ऑपरेशन कमळ’ पुन्हा चर्चेत आले असून भाजप-निजदच्या नेत्यांनी काँग्रेस आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

ऑपरेशन कमळसाठी भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या अनेक आमदारांशी संपर्क साधला असून 50 ते 100 कोटींचे आमिष दाखविण्यात आले आहे. याला आम्ही बळी पडणार नाही. माझ्याशी एका भाजप नेत्याने फोनवर संपर्क साधून 100 कोटी ऊपये देतो. ऑपरेशन कमळसाठी तयारीत रहा, असे सांगितले आहेत, असे स्पष्टीकरण मंड्याचे काँग्रेस आमदार रविकुमार गणिग यांनी दिले आहेत. रविकुमार यांच्या या नव्या राजकीय बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राज्यात पुन्हा ऑपरेशन कमळचा जोर धरू लागला आहे.

भाजप नेत्यांनी काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे. ऑपरेशन कमळसाठी काँग्रेसच्या अनेक आमदारांशी संपर्क साधण्यात आला आहे. 50 ते 100 कोटींचे आमिष दाखविण्यात आले आहे. माझ्याशी एका भाजप नेत्याने फोनवर संपर्क साधून 100 कोटी ऊपये देतो. ऑपरेशन कमळसाठी सज्ज रहा, असे म्हटले होते. मात्र, यावर आपण फोन ठेवा, माझ्याकडून असे काही घडणार नाही. आम्हाला आयटी-ईडीने घाबरवू नका. हे ऑपरेशन कमळ राबविणाऱ्या तुम्हाला आयटी-ईडीची भीती नाही का?, मीच फोन करून ईडीला सांगेन, असे सांगताच भाजप नेत्याचा फोन कट झाला आहे, असे आमदार रविकुमार गणिग यांनी स्पष्ट केले.

वेळ आल्यावर रेकॉर्ड प्रसिद्ध करू

महाराष्ट्राच्या धर्तीवर राज्यातील सरकार पाडण्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही मागाल तेवढे पैसे अॅडव्हान्स देतो, असे सांगून या नेत्यांनी मला आमिष दाखवले आहे. त्या नेत्यांची नावे मी आता सांगणार नाही. वेळ आल्यावर ऑडिओसह रेकॉर्ड प्रसिद्ध करू, असेही आमदार रविकुमार गणिग म्हटले आहेत.

सरकार 5 वर्षे सत्तेत राहणार

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन कमळ थांबविण्यात आले होते. मात्र, आता त्याला पुन्हा जोर दिला आहे. 6-7 महिन्यांपूर्वी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधून आम्हाला ऑपरेशन कमळचे आमिष दाखवले होते. 4-5 महिन्यांपासून सर्व थांबले होते. आता पुन्हा भाजपने काँग्रेसच्या आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आमचे सरकार खडकासारखे भक्कम असून त्याला हलवताही येणार नाही. मात्र, बी. एल. संतोष, शोभा करंदलाजे, एच. डी. कुमारस्वामी आणि प्रल्हाद जोशी काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस पाच वर्षे सत्तेत राहणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या विकासकामे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकार पाडण्याची ताकद भाजपमध्ये नाही

पाच जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरकार पाडण्याचे आश्वासन दिले आहेत. भाजपचे दलाल काँग्रेसच्या आमदारांकडे विनवण्या करत आहेत. आमदारांशी सतत संपर्क साधत असून आमचे आमदार भाजपच्या आमिषांना बळी पडणार नाहीत. आम्ही पुरावे गोळा करून ईडीच्या अधिकाऱ्यांना देत आहोत. कर्नाटकात काँग्रेस सरकार मजबूत आहे. काँग्रेस सरकार पाडण्याची ताकद भाजपमध्ये नाही, असेही आमदार रविकुमार गणिग म्हणाले.

आमदार रविकुमार गणिग यांच्याविरुद्ध तक्रार

काँग्रेस आमदारांना खरेदी करण्यासाठी भाजपने 100 कोटी ऊपयांची ऑफर दिली आहे, असा गंभीर आरोप केलेले काँग्रेस आमदार रविकुमार गणिग यांच्याविरोधात भाजपचे राज्य प्रधान कार्यदर्शी, माजी आमदार पी. राजीव यांनी रविवारी हुबळी येथील उपनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह चार नेत्यांनी काँग्रेस सरकार पाडण्याचा कट रचला असून त्यांनी प्रत्येक आमदाराला 50 ते 100 कोटी ऊपये देण्याचे आमिष दाखविले आहेत, असा आरोप काँग्रेस आमदार रविकुमार गणिग यांनी केला आहे. माध्यमांसमोर खोटे आणि पुराव्याशिवाय आणि राजकीय द्वेषाने आणि पैशाच्या लालसेने खोटे विधान करणे हे बेकायदेशीर आणि गुन्हेगारी वक्तव्य असल्याचे तक्रारीत म्हटले आहेत.

Advertisement
Tags :

.