उत्तर कोरियाची धुरा सांभाळणार 10 वर्षांची कन्या ?
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
हुकुमशाही राजवटीत काय घडेल ते काही सांगता येणार नाही असे म्हटले जाते ते बहुतेक उत्तर कोरिया देश खरे करुन दाखविणार, असे दिसत आहे. या देशाचे हुकुमशहा किम जोंग उन आता निवृत्त होणार असून त्यांचे उत्तराधिकारी होण्यासाठी मोठी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत त्यांचीच 10 वर्षांची कन्या सध्या सर्वात पुढे आहे, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचरांनी मिळविली आहे. त्यांच्या या कन्येचे नाव जू ए असे आहे. एक वर्षापूर्वी तिचे छायाचित्र आणि व्हिडीओ चित्रण प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी ती अवघ्या 9 वर्षांची होती. आता तीच उन यांची उत्तराधिकारी असेल असे अनेकजण छातीठोकपणे बोलत आहेत. ही कन्या सर्व अपत्यांमध्ये त्यांची सर्वात आवडती आहे, असेही बोलले जाते.
नववर्षपूर्वसंध्येला उपस्थित
गेल्या रविवारी 2013 या मावळत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही कन्या आपल्या पित्यासमवेत दिसली होती. उन यांनी आपल्या कन्येचे चुंबन घेतले होते आणि अनेकांनी याची छायाचित्रेही घेतली होती. या घटनेमुळे तीच उन यांच्यानंतर उत्तर कोरियाची सूत्रे हाती घेईल, अशी अटकळ बांधली जात होती. दक्षिण कोरियाच्या गुप्तहेरांनी ही अटकळ बळकट केली आहे.