Sangli : खानापूर तालुक्यात सापडल्या 10 हजार कुणबी नोंदी
विटा प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेल्या कुणबी नोंद शोध मोहिमेत खानापूर तालुक्यात आत्तापर्यंत १० हजार आठ नोंदी सापडल्या आहेत. पारे गावांत सर्वाधिक ६२३ नोंदी सापडल्या आहेत. यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या मोडी लिपी तज्ञ पथकाचा मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने विशेष गौरव केला. यावेळी शंकर मोहिते यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य उपस्थित होते.
शासनाने मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्याचे काम हाती घेतले आहे. महसूल विभाग, पंचायत समिती, नगरपालिका याठिकाणी दोन ते अडीच महिन्यांपासून नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. यासाठी इतिहास संशोधक, मोडी लिपी वाचकांसह संगणक चालकांची नियुक्ती केली आहे. नोंदी शोधण्याचे काम महसूलचे गिरीष इनामदार यांच्या नेतृत्त्वाखालील पथक करीत आहे. इतिहास संशोधक मनोज सरपाटील, मोडीतज्ञ अनिल पवार, मोडी वाचक नारायण देशमुख, सुजित पवार, आशिष शिंदे, ऋषीकेश माळी, सुष्मिता नलवडे, नीलम भोसले, रोहिणी जाधव, अक्षता सरतापे यांचा पथकात समावेश आहे.
सत्कार समारंभाच्या निमित्ताने मोडी तज्ञ पथकातील लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले. यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले. अक्षरशः पंधरा ते सोळा तास काम करून अत्यंत नाजूक कागदपत्रे प्रसंगी भिंगाच्या सहाय्याने तपासून नोंदी शोधल्या आहेत. या माध्यमातून ऐतिहासिक कागदपत्रे हाताळण्याचा योग आला आणि एका चांगल्या कामात सहभागी झाल्याचे समाधान लाभल्याचे मनोज सरपाटील यांनी सांगितले. तर अनिल पवार यांनीही आपण केलेल्या कामामुळे अनेक पिढ्यांचा फायदा होणार असल्याचे समाधान असल्याचे सांगितले.
तहसिलदार उदयसिंह गायकवाड यांनी पथकप्रमुख गिरीश इनामदार यांचे विशेष कौतुक करतानाच प्रसंगी घरातून जेवण आणून पथकातील कर्मचाऱ्यांना त्यांनी सांभाळून घेतले. या दरम्यान हे सर्व लोक एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे राहिले. महिला भगीनींनी मोठे योगदान दिले. त्यांच्या कामाची नोंद राहिल, असेही तहसिलदार गायकवाड म्हणाले.
खानापूर तालुक्यातील ५५ गावांतील नोंदी शोधण्याचे काम पूर्ण झाले आहे. पारे येथे सर्वाधिक ६२३ नोंदी सापडल्या आहेत. रेणावीत ४३२, जखिणवाडी, पोसेवाडी, जाधववाडी, गोरेवाडी, धोंडेवाडी, भडकेवाडी आणि रामनगर या गावात ४५८, कळंबी ४५५, रेवणगांव, ४४३, मंगरूळ ३८८, बलवडी (भा.) ३३४, कुर्ली- घाडगेवाडी ३२१, मोही २७०, भूड २६० तर बामणी येथे २२१ नोंदी सापडल्या आहेत.
गार्डी, कार्वे, वासुंबेसह अन्य गावांतही कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी गाव नमुना १४, जन्म-मृत्यू रजिस्टरमधून घेण्याचे काम अद्यापही सुरू आहे. खानापूर तालुक्यात मराठा सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व्हेक्षणासाठी नेमलेले प्रतिनिधी प्रत्येक गावात जावून काम करणार आहेत. त्यांच्याकडील प्रश्नावलीनुसार नागरिकांनी माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
पात्र लाभार्थ्यांनी प्रकरणे सादर करावीत
दरम्यान ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनी आपली वंशावळ शोधण्यासाठी महसूली पुरावे जमा करावे लागतील. पात्र लोकांनी आवश्यक कागदपत्रे जमवून प - करणे सादर करावीत. यासाठी दोन्ही तालुक्यातील सेतू कार्यालयांची बैठक नुकतीच घेतली आहे. त्यांना सुचना दिल्या आहेत. त्यामुळे अधिकाधीक पात्र लाभार्थ्यांनी प्रकरणे सादर करावीत, असे आवाहन तहसिलदार उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.