तेलंगणात 10 पोलीस बडतर्फ, 39 निलंबित
सभा, रॅलींवर बंदी : निदर्शनांप्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ हैदराबाद
‘एक राज्य, एक पोलीस धोरण’ अशी मागणी करणाऱ्या तेलंगणा स्पेशल पोलीस विभागाच्या निदर्शने करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली आहे. शिस्तभंग आणि अनधिकृत निदर्शनांमध्ये सामील 10 पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहेत. तर 39 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निदर्शकांनी सोमवारी हैदराबादच्या इंदिरा पार्क चौकाच्या दिशेने कूच केली होती. पोलिसांनी एनटीआर स्टेडियमनजीक मोठा बंदोबस्त ठेवून निदर्शकांना संबंधित स्थळी पोहोचण्यापूर्वीच अटक केली होती. यादरम्यान 21 पोलीस कर्मचाऱ्यांना बीएनएसएसमधील कलम 163 अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. तर संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी शहराच्या सीमेत सभा, रॅली आणि निदर्शनांवर ब्ंांदी घालण्यात आली आहे.
कारणे दाखवा नोटीस
हैदराबाद पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतरही हे पोलीस कर्मचारी निदर्शनांमध्ये सामील झाले होते. डोमलगुडा पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्वांच्या विरोधात पुढील काळात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
राज्य पोलीस महासंचालक जितेंद्र आणि टीजीएसपीचे प्रमुख संजय जैन यांनी पोलीस विभागात शिस्तभंग आणि अवज्ञेची कुठलीच घटना सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या घटनांच्या विरोधात कठोर कारवाई आणि विभागीय कारवाई केली जाणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांकडून सेवेचे मापदंड राखले जातील अशी अपेक्षा असल्याचे विभागाकडून म्हटले गेले आहे.