अपूर्ण अवस्थेत राहिलेल्या पाणी टाक्यांपैकी 10 टाक्या 10 जानेवारीपर्यंत कार्यान्वित करा-आ. अमल महाडिक
कोल्हापूर :
आमदार अमल महाडिक यांनी अमृत 1.0 योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्यांना भेट देऊन पाहणी केली. शहरवासीयांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी या टाक्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या जल अभियंता आणि अधिकाऱ्यांना दिल्या.
या टाक्यांपैकी 10 टाक्यांची कामे 10 जानेवारी पर्यंत पूर्णत्वाला न्यावीत असे निर्देश आमदार महाडिक यांनी दिले. तर उर्वरित टाक्यांची कामे जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करावीत असे आदेश महाडिक यांनी दिले. शहरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलवाहिन्यांची कामे लवकर मार्गी लावावीत. पंपिंग स्टेशनमध्ये होणारा विजेचा खर्च कमी करण्यासाठी पाणी उपसा केंद्रांवर सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा करू असे आश्वासन महाडिक यांनी दिले.
शिंगणापूर पाणी योजना अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी आणि बळकटी करणासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार करावा शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा करू असा विश्वास महाडिक यांनी दिला.
शहराच्या ज्या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्या भागांमध्ये सुरळीत पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात. पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि पाणीपुरवठा विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली.
अमृत योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाची पाहणीही आमदार महाडिक यांनी पंचगंगा प्रदूषणाला आळा करण्यासाठी शहरातील ड्रेनेज व्यवस्था सक्षम करावी आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा अशा सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या.यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली.
या ठिकाणीही त्यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.