जिल्ह्यात 10 नवीन पोलीस स्थानके
प्रतिनिधी/ बेळगाव
वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन बेळगाव जिल्ह्यात दहा नवीन पोलीस स्थानके सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बेळगाव शहरात तीन व जिल्ह्यात सात अशी दहा नवीन पोलीस स्थानके सुरू करण्यात येणार आहेत.
कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्याबरोबरच वाढती गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलीस स्थानकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या असलेले बळ यासाठी अपुरे पडत आहे. त्यामुळे आहे ते अधिकारी व पोलिसांवर कामाचा ताण वाढतो आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पोलीस स्थानकांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. जिल्ह्यात आणखी सात पोलीस स्थानकांची भर पडणार आहे. बेळगावात दोन वाहतूक पोलीस स्थानके आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार आणखी दोन वाहतूक पोलीस स्थानके व एक महिला पोलीस स्थानक सुरू करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वीच पाठविण्यात आला होता. आता सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला असून गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी लोकसंख्येनुसार पोलीस स्थानकांची संख्या वाढविण्यात येत असल्याचे सांगितले आहे.