जिल्हा पंचायतीसाठी भाजपचे आणखी 10 उमेदवार जाहीर
आतापर्यंत एकूण 29 उमेदवार घोषित : 50 मतदारसंघांसाठी 20 रोजी निवडणूक होणार
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काल मंगळवारी दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी 6 आणि दक्षिण गोव्यासाठी 4 मिळून एकूण 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राज्यात दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी मिळून 50 मतदारसंघांसाठी दि. 20 रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी दि. 1 पासून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. तरीही अनेक राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवारांचीच घोषणा केलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आप, भाजप, काँग्रेस यांनी काही नावांची घोषणा केली आहे. त्यात भाजपने काल मंगळवारी 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने तीन मतदारसंघ आपला घटकपक्ष असलेल्या मगोसाठी सोडलेले आहेत. उर्वरित मतदारसंघांतून ते निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 29 उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. मात्र गत दोन दिवसांमध्ये त्यांच्या एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.