अंदाधुंद गोळीबारात न्यूयॉर्कमध्ये 10 ठार
सुपरमार्केटमध्ये हल्ला ः हल्लेखोराला अटक
न्यूयॉर्क / वृत्तसंस्था
न्यूयॉर्कमधील बफेलो भागातील एका सुपरमार्केटमध्ये शनिवारी रात्री उशिराने अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. या दुर्घटनेत किमान 10 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तसेच 3 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. या घटनेचा तपास एफबीआयकडे सोपवण्यात आला आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री 12 वाजल्यानंतर ही घटना घडली. हल्लेखोराने ज्या 13 जणांवर गोळय़ा झाडल्या आहेत त्यापैकी 11 जण कृष्णवर्णीय असल्याची माहिती तपासातून स्पष्ट झाली आहे. गोळीबाराची घटना घडलेल्या परिसरात कृष्णवर्णीय लोकांची वस्ती सर्वाधिक आहे. पोलीस जातीय हल्ल्याच्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना गोळीबार आणि त्यानंतरच्या तपासाबाबत सातत्याने माहिती दिली जात असल्याचे व्हाईट हाऊसचे प्रेस सेपेटरी जीन पियरे यांनी सांगितले. तसेच युएस फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) शनिवारी संध्याकाळपासून आरोपींची चौकशी करत आहे. गोळीबार वांशिक प्रेरणेने झाल्याचा अधिकाऱयांचा संशय आहे.
सुपरमार्केटच्या किराणा दुकानात गोळीबार
बफेलो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टॉप्स सुपरमार्केटमधील एका किराणा दुकानात गोळीबार झाला. पेटन एस. गेंडरॉन असे हल्लेखोराचे नाव असून तो केवळ 18 वर्षीय आहे. व्हिडीओमध्ये बंदूकधारी आपली कार सुपरमार्केटसमोर पार्क करताना दिसत आहे. त्याच्या शेजारच्या सीटवर एक रायफल ठेवली आहे. सुरुवातीला पार्किंगमधून बाहेर पडणाऱया लोकांवर त्याने हल्ला केला. हल्ल्यासाठी तो मिलिटरी स्टाईल गीअर्ससह सुपरमार्केटमध्ये घुसला होता. त्याने बुलेटप्रूफ जॅकेटही घातले होते. हल्लेखोराने हेल्मेटला कॅमेरा लावून हल्ल्याचे लाईव्ह स्ट्रीमिंगही केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
गोळी लागूनही हल्लेखोर सुरक्षित
गोळीबारादरम्यान हल्लेखोराने लष्करी शैलीचे कपडे आणि काळे हेल्मेट परिधान केले होते, असे सुपरमार्केटमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. गोळीबाराची कुणकुण लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच त्याने आत्मसमर्पण केल्याने त्याला जिवंत पकडण्यात यंत्रणांना यश आले आहे. स्टोअरच्या आत एका सुरक्षा रक्षकाने हल्लेखोरावर अनेक गोळय़ा झाडल्या पण बुलेटप्रूफमुळे हल्लेखोर पळून गेला आणि सुरक्षा रक्षकाला ठार मारले.