अफगाणिस्तानात हल्ल्यात 10 ठार
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तान देशाच्या उत्तर बाघलान प्रांतात बंदुकधारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 10 नागरीकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती त्या देशाच्या गृह आणि सुरक्षा विभागाचे प्रवक्ते अब्दुल मतीन क्वेनी यांनी दिली आहे. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी हे कृत्य पाकिस्तान समर्थित संघटनेचे असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अफगाणिस्तानात टोळीयुद्धाचा भडका कायमचा आहे. शुक्रवारचा हल्ला हा टोळीयुद्धातूनही घडला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यातील हा दुसरा अशा प्रकारचा हल्ला आहे. सप्टेंबरमध्ये मध्य अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 14 नागरीकांचा बळी गेला होता. 2021 मध्ये या देशाची सत्ता तालिबान या संघटनेने हाती घेतली. देशाच्या नागरीकांना सुरक्षा देण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत, अशी घोषणा त्यावेळी या संघटनेने केली होती. मात्र, तालिबान प्रशासनालाही टोळी युद्धे आणि दहशतवादी संघटनांवर नियंत्रण ठेवण्यात यश आलेले नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढच झालेली दिसून येत आहे. अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारचा देश पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये दहशतवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.