क्वेटामधील स्फोटात 10 ठार, 30 जखमी
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात पुन्हा हाहाकार
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत अशांततेचा काळ अनुभवत आहे. अलिकडच्या काळात अनेक हल्ले झाले आहेत. 30 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या निमलष्करी सुरक्षा दलांच्या मुख्यालयाबाहेर एक शक्तिशाली कार बॉम्बस्फोट होऊन किमान 10 जण ठार आणि 30 जण जखमी झाले. या स्फोटापूर्वी कारमधील किमान सहा दहशतवादी बाहेर पडले. वाहनाचा स्फोट करण्यापूर्वी या दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या संघर्षात सर्व सहा हल्लेखोर ठार झाल्याचे वृत्त आहे. नैर्त्रुत्य क्वेटा शहरात झालेल्या या स्फोटाचा आवाज काही मैल दूरपर्यंत ऐकू आल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरीसमोर घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या. बचाव पथकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले. अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. प्रांतीय आरोग्यमंत्री बखत काकर यांनी मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच हल्लेखोरांनी सुरक्षा दलांच्या मुख्यालयाला लक्ष्य केल्याचेही त्यांनी सांगितले. हल्ल्यात सहा हल्लेखोरांचा सहभाग होता आणि ते सर्व सुरक्षा दलांनी मारल्याचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक टेलिव्हिजन चॅनेल आणि स्फोटस्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये निमलष्करी दलाच्या कंपाऊंडच्या गेटसमोर एक कार थांबलेली दिसत आहे. स्फोटानंतर गोळीबारही झाला. या भीषण स्फोटामुळे जवळच्या इमारतींच्या खिडक्या फुटल्या आणि जवळच्या गाड्यांचे नुकसान झाल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बॉम्बस्फोटाचा निषेध केला. तसेच सुरक्षा दलांनी तातडीने प्रत्युत्तर दिल्याबद्दल आणि हल्लेखोरांना ठार मारल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनीही हल्ल्याचा निषेध केला. क्वेटाजवळील एका स्टेडियमबाहेर एका राजकीय पक्षाचे समर्थक रॅलीतून बाहेर पडत असताना झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटाच्या काही आठवड्यांनंतर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान 13 जण ठार झाले आणि 30 जण जखमी झाले होते.