10 कंपन्यांचे मूल्य 6 आशियाई देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त
पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान यांना टाकले मागे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या 10 मूल्यवान कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 6 आशियाई अर्थव्यवस्थांच्या जीडीपीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे मूल्य 238 अब्ज डॉलर्स इतके असून श्रीलंका, नेपाळ, मालदीव व भूतान यांच्या जीडीपीपेक्षा ते अधिक आहे. यावरुन भारतीय कंपन्यांची आर्थिक मजबुत स्थिती लक्षात यावी.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने बांगलादेशचा जीडीपी अंदाजे 446 अब्ज डॉलर्सचा असल्याचे म्हटले आहे. भारतातील 10 आघाडीवरच्या मौल्यवान कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रिज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस यांच्यासह मूल्य पाहता 89 लाख 97 हजार 849 कोटी रुपयांचे होते. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि मालदीव या देशांच्या जीडीपीपेक्षा वरील 10 टॉप कंपन्यांचे मूल्य अधिक आहे.
पाकिस्तानची स्थिती
शेजारचा देश पाकिस्तान तर सध्याला आर्थिक तंगीने जंग जंग पछाडतो आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. या पाकिस्तानची अर्थव्यवस्था 340 अब्ज डॉलर्सची आहे. दुसरीकडे श्रीलंकेची अंदाजे 74.84 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून नेपाळ 41.339 अब्ज डॉलर्स, मालदीव 6.97 अब्ज डॉलर्स व भूतानची 2.68 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे.