10 चेंडूमुळे 10 लाख डॉलर्सचे नुकसान
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केवळ 10 चेंडूंसाठी 10 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे (सुमारे 5.4 कोटी रुपये) नुकसान सहन करावे लागले.
पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी फक्त 13.2 षटकांचा खेळ झाला. सीएच्या नियमानुसार 15 षटकांचा खेळ झाला असता तर पहिल्या दिवशी जी तिकीटविक्री झाली त्याचे पूर्ण पैसे प्रेक्षकांना परत करावे लागले नसते. पण फक्त 10 चेंडू कमी खेळ झाल्याने सीएला तिकीटविक्री झालेले 10 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स प्रेक्षकांना रिफंड करावे लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. या सामन्याला प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि पहिल्या दिवशी 30,145 प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. पण एका तासात 40 मिमी पाऊस झाल्याने त्यांची पूर्ण निराशा झाली होती.