बेळगाव विभागात 10.6 टक्के चुकीच्या पद्धतीने रेशनकार्डांची नोंद
बेळगाव : अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दरमहा 10 किलो तांदूळ वितरण सुरू झाल्यानंतर विविध रेशनकार्डांची संख्या वाढली आहे. 11 टक्के रेशनकार्डे बनावट असून चुकीच्या पद्धतीने बीपीएलमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे समजते. बेळगाव विभागात 10.6 टक्के चुकीच्या पद्धतीने रेशनकार्डांची नोंद करण्यात आली आहे. राज्य सरकार बनावट व चुकीच्या पद्धतीने बीपीएलमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्यांचा शोध घेऊन ती रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यादृष्टीने कार्यवाहीही करण्यात येत आहे. राज्य देखरेख मूल्यमापन प्राधिकरणच्या समालोचक संस्थेने पॅन इंडिया नेटवर्कद्वारे पाहणी करून आपला अहवाल शिफारसीसह प्राधिकरणाला सादर केला आहे. एकूण रेशनकार्डांची संख्या 2016-17 ते 2021-22 पर्यंत 23 टक्के वाढली आहे.
2016-17 मध्ये 1 कोटी 7 लाख 42 हजार 794 वरून 2021-22 मध्ये 1 कोटी 32 लाख 12 हजार 740 वर पोहोचली आहे. अंत्योदय अन्न योजनेंतर्गत 7 लाख 93 हजार 221 ते 10 लाख 85 हजार 840 (37 टक्के) लाभार्थी आहेत. बीपीएल रेशनकार्डे 98 लाख 28 हजार 718 ते 1 कोटी 14 लाख 28 हजार 81 (17 टक्के) व एपीएलकार्डे 2 लाख 20 हजार 755 वरून 6 लाख 98 हजार 712 पर्यंत वाढ झाली आहे. रेशनकार्डासाठी गोरगरीब यांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात एकूण 11 टक्के लाभार्थ्यांची चुकीच्या पद्धतीने नोंद झाली आहे. यामध्ये बेळगाव विभागात 10.6 टक्के, म्हैसूर विभागात 15.4 टक्के, बेंगळूर 10 टक्के व गुलबर्गामध्ये सर्वात कमी 9.7 टक्के बीपीएल रेशनकार्डांची चुकीच्या पद्धतीने नोंद झाली असल्याचे समोर आले आहे. महिला बीपीएल रेशनकार्डधारकांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत गेली आहे.