1 मुचंडी गावची लक्ष्मी यात्रा मे 2026 मध्ये
वार्ताहर / सांबरा
मुचंडी गावची लक्ष्मी यात्रा 12 मे 2026 रोजी करण्याचे ग्रामस्थांच्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. यात्रेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार दि. 19 रोजी गावामध्ये कटबंद वार पाळून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
येथील औदुंबर मंगल कार्यालयामध्ये ग्रामस्थांची बैठक बोलविण्यात आली होती. व्यासपीठावर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष मल्लाप्पा सुगणी (पाटील), ग्रा. पं. अध्यक्ष संदीप जक्काने, देवस्की पंच अरविंद भातकांडे व बसलिंग वालीशेट्टी उपस्थित होते. स्वागत रेवाणी मोदगेकर यांनी केले. प्रास्ताविक ग्रा. पं. अध्यक्ष संदीप जक्काने यांनी करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
त्यानंतर बैठकीत विविध विषयावर चर्चा करून ग्रामस्थांची मते जाणून घेण्यात आली व सर्वमताने 12 मे 2026 रोजी यात्रा करण्याचे ठरविण्यात आले. मागील यात्रा सन 1995 मध्ये झाली होती. तब्बल 30 वर्षांनंतर यात्रा होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 5 मे 2026 ला अंकी घालण्याचा व सीमा बांधण्याचा कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले. तसेच बैठकीमध्ये यात्रा कमिटी स्थापण्याचेही ठरविण्यात आले. ग्राम पंचायतीने यात्रेपूर्वी अर्धवट कामे पूर्ण करून विविध विकासकामे करावीत, असेही ठरविण्यात आले. तसेच डॉल्बी, बॅनर, पार्किंग, पाणीसमस्या, वीजपुरवठा, वर्गणी जमा करण्यासह यात्रेसंबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये अनेक दानशूर व्यक्तींनी देणग्या जाहीर करून ग्रामस्थांचा उत्साह वाढविला.