तैवानला हवेत भारताचे 1 लाख कामगार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तैवानने भारताकडे 1 लाखाहून अधिक प्रशिक्षित कामगार पुरविण्याची मागणी केली आहे. भारतानेही असे कामगार पुरविण्याची तयारी दर्शविली असून त्या दिशेने काम सुरु केले आहे. यासाठी तैवानशी भारताला करार करावा लागणार असून पुढच्या महिन्यात असा करार होण्याची शक्यता आहे.
तैवानला कारखाने, शेते आणि रुग्णालये यांच्यात काम करण्यासाठी विविध स्तरांवरील प्रशिक्षित कामगार हवे आहेत. भारतामध्ये अशा कामगारांची उपलब्धता असल्याने तैवानने तशी विचारणा भारताकडे केली आहे. भारतानेही तसा करार करण्यासाठी उत्सुकता दाखविल्याने लवकरच भारतीय अनेक भारतीय कामगारांना तैवानमध्ये काम करण्याची संधी मिळेल अशी शक्यता आहे.
वृद्ध होणारी जनसंख्या
दिवसेंदिवस वृद्ध होणारी जनसंख्या ही तैवानची समस्या आहे. त्यामुळे आर्थिक विकासाचा दर राखण्यासाठी आणि उद्योगांचा विकास होण्यासाठी या देशाला अधिक प्रमाणात तरुण कर्मचारी आणि कामगारांची आवश्यकता आहे. प्रशिक्षित आणि विश्वासार्ह तसेच कष्टाळू कामगार भारतात अधिक संख्येने असून भारतालाही या कामगारवर्गाला काम मिळून देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या परस्परावलंबी आवश्यकतांमुळे भारतीय कामकारांना नवी संधी उपलब्ध होत आहे.
मोठी अर्थव्यवस्था
तैवानची अर्थव्यवस्था साधारणत: 80 हजार कोटी डॉलर्सची (जवळपास 7 लाख कोटी रुपये) आहे. ती सुरु ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तैवानमध्ये बेरोजगारीचा दर जगात सर्वात कमी आहे. त्यामुळे त्या देशात भारतातील कर्मचाऱ्यांना मोठी संधी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तेरा देशांशी करार
भारताने आतापर्यंत मनुष्यबळ पुरविण्याचा करार 13 देशांशी केला आहे. त्यात प्रामुख्याने जपान, फ्रान्स आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. नेदरलँड, ग्रीस, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड या देशांशीही चर्चा सुरु आहे. ऑस्ट्रेलियानेही भारताशी असा करार करण्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे, अशी माहिती देण्यात आली.
इस्रायलकडूनही मागणी
सध्या हमासशी होणाऱ्या युद्धात गुंतलेल्या इस्रायलनेही भारताकडे 1 लाखाहून अधिक कामकारांची मागणी केली आहे. इस्रायल आतापर्यंत पॅलेस्टाईनी नागरिकांना अशी कामे देत होता. तथापि, 7 ऑक्टोबरला त्या देशावर हमासने केलेल्या भीषण हल्ल्यानंतर या देशाने पॅलेस्टाईनी कामगारांना काम देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यास्थानी भारताच्या कामगारांना पाठविण्याची मागणी भारताकडे करण्यात आली आहे. त्यामुळे तेथेही संधी उपलब्ध होत आहे.