For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात शिक्षणासाठी 1 लाख कोटी

11:49 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात शिक्षणासाठी 1 लाख कोटी
Advertisement

गोव्यात शिक्षणासाठी 1 लाख कोटी : मडगाव येथील विराट जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी,जनता-सरकारचे कौतुक, 1330 कोटींच्या प्रकल्पांचा शिलान्यास

Advertisement

मडगाव : गोवा हे जगाच्या नकाशावर पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. पर्यटनाबरोबर गोव्यात फुटबॉल खेळही प्रसिद्ध आहे. यावर मर्यादित न राहता गोव्याला शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित केले जाईल. संशोधन आणि शिक्षण क्षेत्रासाठी 1 लाख कोटींचा निधी देण्याची ‘गॅरंटी’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मडगावातील जाहीर सभेतून दिली. ‘विकसित भारत, विकसित गोवा 2047’ च्या निमित्ताने काल मंगळवारी मडगाव येथील कदंब बसस्थानकावर भरदुपारी आयोजित केलेल्या जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावली होती.

समेस्त गोंयकारांक...

Advertisement

‘समेस्त गोंयकाराक मनाकाळजासावन नमस्कार, तुमचो मोग आनी उर्बा पळोवन माका गोंयात येवंक सदाच खोशी जाता’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कोकणीतून केली.

गोव्याच्या विकासाची गॅरंटी

या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या विकासाची ‘गॅरेंटी’ दिली. आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी विविध मुद्यांना स्पर्श केला. गोव्याचा झपाट्याने विकास होत आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. आपल्या ‘गॅरेंटी’मुळे गोव्यातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुखी, समाधानी होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

प्रकल्पांचे उद्घाटन, शिलान्यास

यावेळी आभासी पद्धतीने पंतप्रधानांनी कुंकळळी येथील एनआयटी गोवा कॅम्पस, दोनापावला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्टस्, काकोडा-कुडचडे येथील कचरा प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्याच बरोबर पणजी ते रेईश मागुश किल्यादरम्यान रोपवे प्रकल्प, शेळपे-सांगे येथील 100 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा शिलान्यास घातला. हे प्रकल्प 1,330 कोटींचे आहेत.

गोव्यात ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’

सुंदर समुद्रकिनारे आणि समृद्ध पर्यावरण अशी गोव्याची ओळख आहे. गोवा हे देश-विदेशांतील लाखों पर्यटकांचे पसंतीचे पर्यटन केंद्र आहे. कोणत्याही हंगामात गोव्यात ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ पहायला मिळतो, असे पंतप्रधान म्हणाले. गोव्dयाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, खासदार सदानंद तानावडे यांची भाषणे झाली. माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी स्वागत केले.

गोवा ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून उदयास येतेय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, गोवा हे लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येत आहे. राज्याच्या आर्थिक विकासाचे श्रेय तऊणांसाठी विविध प्रकारच्या रोजगार शोधत आहे. एनआयटी पॅम्पस आणि इतर प्रकल्पांसारखे नव्याने उद्घाटन झालेले प्रकल्प गोव्याच्या जलद विकासाला नक्कीच चालना देतील. गोव्यातील सामाजिक आणि सांप्रदायिक सौहार्दाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गोव्याने अनेक प्रमुख केंद्रीय कल्याणकारी योजनांमध्ये 100 टक्के यश प्राप्त केले आहे. योजनांच्या यशामुळे सर्व भेदभाव संपुष्टात येतात.

मोदींकडून राज्य सरकारचे कौतुक

गोव्यातील लोकांसाठी रोजगाराच्या नवीन संधींचा शोध घेऊन मत्स्यपालन क्षेत्रातील व्यावसायिक क्रियाकलाप वाढवण्याच्या सरकारी हेतूंची पंतप्रधानांनी माहिती दिली. राज्य सरकार लोकांना 100 टक्के वीज कनेक्शन, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा पुरवण्यास सक्षम असल्याने मोदींनी राज्य सरकारचे कौतुक केले. यावेळी वन हक्क कायद्यान्वये सनदी प्रदान करण्यात आल्या. तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रेही दिली.

सरकारकडून अंत्योदय तत्वाचे पालन : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, सरकार अंत्योदय या तत्त्वाचे पालन करते. त्यामुळे सर्वसमावेशक गोव्याच्या कल्पनेला चालना देणारे विविध उपक्रम आणि प्रकल्प राबवले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स पॅम्पस, दोनापावल आणि इतर प्रकल्पांचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटतो, कारण हे प्रकल्प नक्कीच राज्याच्या विकासाला गती देतील, असेही ते म्हणाले. गेल्या दहा वर्षात सरकारने विविध क्षेत्रात केलेली प्रगती आणि त्याचा लोकांवर काय परिणाम झाला याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पुनऊच्चार केला. आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले आहे. कायदा व न्यायमंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणाले की, गोव्याने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली प्रचंड विकास साधला आहे. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, खासदार सदानंद तानावडे यांनीही आपले विचार मांडले. सुरुवातीला आमदार दिगंबर कामत यांनी सर्वांचे स्वागत केले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, सभापती रमेश तवडकर, क्रीडामंत्री गोविंद गावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, कृषिमंत्री रवी नाईक तसेच मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर उपस्थित होते.

सभेला 50 नव्हे, 70 हजारांची उपस्थिती

विकसित भारत, विकसित गोवा यात्रेला 50 हजार नव्हे तर 70 हजार लोकांची उपस्थिती लाभली, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. सभा खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे मत त्यांनी मांडले. सभेच्या ठिकाणी येण्यासाठी लोकांना खासगी तसेच कदंब व कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील बसगाड्यांची व्यवस्था केली होती. भरदुपारी सभा असल्याने जेवणाची व्यवस्था तीन ठिकाणी केली होती. मात्र, बऱ्याच लोकांना जेवण मिळू न शकल्याने काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोचले व त्यांनी हस्तक्षेप केला व अतिरिक्त जेवण आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे तशी व्यवस्था करण्यात आली.

Advertisement
Tags :

.