आघाडीवरच्या 4 कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यात 1 लाख कोटीची भर
एलआयसीचे वाढले सर्वाधिक भांडवल मूल्य : रिलायन्सचे मूल्य घसरणीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहा पैकी चार कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1 लाख कोटी रुपयांनी वाढले असल्याचे पाहायला मिळाले आहे. मागच्या आठवड्यात लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) ही बाजार भांडवल मूल्य वाढवण्यामध्ये सर्वात आघाडीवर राहिली होती.
मागच्या आठवड्यामध्ये मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 270 अंकांनी घसरणीत राहिला होता. दुसरीकडे एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी या कंपन्यांच्या बाजारमूल्यामध्ये वाढ झालेली दिसून आली. दुसऱ्या बाजूला बाजार भांडवलातली आघाडीवरची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज तसेच आयटी क्षेत्रातील कंपन्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये मात्र घसरण झालेली दिसून आली.
यांच्या बाजार मूल्यात वाढ
कंपन्यांच्या बाजार भांडवलावर नजर टाकली असता एलआयसीचे बाजारमूल्य 59 हजार 233 कोटी रुपयांनी वाढत 6,03,120 कोटी रुपयांवर पोहोचले. स्टेट बँकेचे बाजार भांडवल 19,589 कोटी रुपयांनी वाढत 7 लाख 25 हजार 36 कोटी रुपयांवर पोहोचले. सोबत भारतीय दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवलमूल्य 14 हजार 84 कोटी रुपयांनी वर चढत 10 लाख 58 हजार 766 कोटी रुपयांवर पोहोचले होते. एचडीएफसी बँकेचे भांडवलसुद्धा 8462 कोटींसह वाढत 14,89,185 कोटी रुपयांवर पोहोचले
यांच्या भांडवलामध्ये घसरण
टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 17909 कोटी रुपयांनी कमी होत 12,53,486 कोटी रुपयांवर स्थिरावले. दिग्गज कंपनी रिलायन्सचे बाजार मूल्य 7645 कोटींनी कमी होत 19,22,693 कोटींवर तर बजाज फायनान्सचे बाजार मूल्य 4061 कोटींनी कमी होत 5,70,146 कोटी रुपयांवर स्थिरावले. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 2605 कोटी रुपयांनी घसरत 10 लाख 31 हजार 262 कोटी रुपयांवर राहिले होते.