हुगळीतील स्फोटात 1 ठार, 2 मुले जखमी
भाजपकडून एनआयए चौकशीची मागणी
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील हुगळीच्या पांडुआ भागातील टिन्ना नेताजी कॉलनीत सोमवारी झालेल्या स्फोटात एका युवकाचा मृत्यू झाला तर दोन मुले गंभीर जखमी झाली. दोघांनाही ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लहान मुले खेळत असलेल्या मैदानात हा स्फोट झाला. लहान मुलांनी चेंडू समजून हा बॉम्ब हाताळल्याची माहिती प्राथमिक तपासात स्पष्ट झाली आहे.
मैदानात झालेल्या स्फोटानंतर स्थानिक भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी या घटनेची एनआयए चौकशीची मागणी करत दोन तासांहून अधिक काळ रास्तारोको केला. या स्फोटात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यापूर्वी 2 मे रोजी पश्चिम बंगाल पोलिसांनी कूचबिहारमधील सीतलकुची परिसरात 22 क्रूड बॉम्ब निकामी केले होते. गेल्या महिन्यात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) संदेशखालीमध्ये झडतीदरम्यान परदेशी पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त केला होता.