मठाधीशांना धमकावून उकळले तब्बल 1 कोटी
रामदुर्गच्या निजद नेत्याचा प्रताप : 82 लाख रुपये केले जप्त, आणखी एका साथीदारालाही अटक, फसवणारी मोठी टोळी बेळगावसह उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत
बेळगाव : बेळगावसह उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. कधी सायबर गुन्हेगारांकडून तर आणखी कधी स्थानिक गुन्हेगार सावजांना ठकवत आहेत. या गुन्हेगारांनी मठाधीशांनाही सोडले नाहीत. बागलकोट जिल्ह्यातील एका मठाधीशांना धमकावून एक कोटी रुपये उकळल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारात मूळचा मुधोळ, जि. बागलकोट, सध्या रामदुर्ग येथे राहणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याला अटक झाली आहे. बेळगाव, बागलकोट जिल्ह्यात या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मठाधीशांना ठकविण्यासाठी या राजकीय नेत्याने अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालकांच्या नावाचा वापर केला आहे. त्यामुळे पोलीस दलालाही धक्का बसला आहे. बागलकोटचे जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महांतेश्वर जिद्दी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला अटक करून फसवणुकीच्या रकमेपैकी 82 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
लोकायुक्त अधिकारी असल्याचे सांगून सरकारी अधिकाऱ्यांना फसवणारी मोठी टोळी बेळगावसह उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत आहे. मठाधीशांना ठकवणाऱ्या संशयिताने मात्र यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केला आहे. त्यामुळे पोलीस दलानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. रामदुर्ग येथील निजदचा नेता प्रकाश मुधोळ याला अटक केली आहे. त्याच्या आणखी एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. सीमीकेरी, ता. जि. बागलकोट येथील रामारुड मठाचे श्रीमद् परमहंस परमरामारुड स्वामीजी (वय 63) यांना ठकविण्यात आले आहे. कर्नाटकात मठाधीशांना एक वेगळेच स्थान आहे. पूज्य भावनेने त्यांच्याकडे पाहिले जाते. रामारुड मठाधीशांना मानणारा वर्गही मोठा आहे. मात्र, अत्यंत सहजपणे ते ठकसेनांच्या जाळ्यात अडकले आहेत. बागलकोट पोलिसांनी रामदुर्गमध्ये तपास चालविला आहे.
फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेला प्रकाश मुधोळ हा मूळचा मुधोळचा. सध्या रामदुर्ग येथे त्याचे वास्तव्य आहे. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास स्वामीजींच्या मोबाईलवर एक कॉल आला. पलीकडच्या व्यक्तीने आपण डीएसपी सतीश बोलतो. गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून आमच्याकडे तुमच्याविरुद्ध भरपूर प्रकरणे आली आहेत. त्यांची चौकशी करायची आहे. तुला अद्दल घडवायची आहे, असे पलीकडील व्यक्ती सांगते. पहिल्यांदाच आलेल्या धमकीच्या फोन कॉलमुळे रामारुड स्वामीजींना धक्का बसतो. ते विचारात पडतात. मठाच्या भाविकांना ही गोष्ट कळाली तर मठाची व आपली बदनामी होणार. आपल्याविरुद्ध आरोप तरी कोणते आहेत, याचीही आपल्याला माहिती नाही. आता काय करायचे? असा प्रश्न पडलेला असतानाच आपण एडीजीपी (अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक) आहोत असे सांगत दुसरा फोन येतो. तेव्हा तर जीवे मारण्याची धमकी दिली जाते.
तुझ्याविरुद्ध अनेक तक्रारी आहेत. एडीजीपी साहेबांना पैसे देऊन प्रकरणे संपवून घे. नाहीतर तुला संपवतो, असे धमकावण्यात येते. शिवीगाळ, धमकीमुळे स्वामीजींना भीती वाटते. आपल्याला फोन करणारे खरोखरच पोलीस अधिकारी आहेत का, या विचारात असताना बागलकोट हायवे पेट्रोलिंग विभागाचा एक साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामारुड मठाला जातो. स्वामीजींकडून थोडीफार माहिती घेतो. त्यानंतर तर स्वामीजींना खात्री पटते. आपल्याला फोन करणारे हे पोलीस अधिकारीच आहेत, या निर्णयाप्रत ते येतात.
लगेच दुसऱ्या दिवशी 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बेंगळूर येथील विधानसौधजवळ 61 लाख रुपये पोहोचविण्यात येतात. आपण अडचणीत आहोत, असे सांगत स्वामीजी आपल्या भक्तांकडून पैसे गोळा केलेले असतात. दि. 20 सप्टेंबर रोजी मध्यरात्री हुबळी येथील ईदगाह मैदानजवळ 39 लाख रुपये पोहोचविण्यात येतात. दोन कोरे धनादेशही घेतलेले असतात. इतके पैसे घेऊन प्रकाश मुधोळ निवांत बसला असता तर कदाचित हे प्रकरणच उघड झाले नसते.
रामारुड स्वामीजींनी एक कोटी रुपये पोहोचविल्यानंतर प्रकाशच्या मनात आणखी पैशांची हाव सुटली. त्याने 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास पुन्हा स्वामीजींना फोन केला. आणखी पैसे पाठवा नाहीतर तुम्हाला सोडणार नाही, असे धमकावण्यात आले. आता मात्र स्वामीजींच्या मनात शंका आली. साहेब, सांगतील त्या ठिकाणी, सांगतील तितकी रक्कम पोहोचविण्यात आली आहे. तरीही पुन्हा पैशांची मागणी का केली जात आहे? असा विचार केल्यानंतर आपण फसलो नाही ना, असा संशय स्वामीजींच्या मनात बळावला. त्यानंतर थेट शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी बागलकोट येथील सायबर क्राईम विभागात स्वामीजींनी फिर्याद दिली. पोलिसांनी प्रकाश मुधोळच्या मुसक्या आवळल्या. त्याची चौकशी केली असता एडीजीपींच्या नावाने आपण रक्कम उकळल्याची कबुली त्याने दिली आहे.
मठाधीशांना फसविल्याच्या घटनेने पोलीस अधिकारीही थक्क
15 सप्टेंबर रोजी राज्य सरकारच्यावतीने मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी पोलीस यंत्रणा या सरकारी कार्यक्रमात व्यस्त होती. प्रकाश मुधोळने हायवे पेट्रोलिंगच्या एका साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला गाठले. रामारुड स्वामीजींचा फोन लागत नाही. तुम्ही जरा त्यांच्या मठाला जाऊन फोन लावून द्या, असे सांगितलेले असते. त्याचे ऐकून मैत्रीखातर साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वामीजींना भेटण्यासाठी जातात. त्यावेळी आपल्याला फोन करणारे खरोखरच पोलीस अधिकारी आहेत, याची त्यांना खात्री पटते. त्यामुळेच त्यांची फसवणूक होते. प्रकाश मुधोळ हा 2023 च्या विधानसभा निवडणुकीत रामदुर्ग मतदारसंघातून निजदचा उमेदवार होता. मठाधीशांना फसविल्याच्या घटनेने पोलीस अधिकारीही थक्क झाले आहेत. खरोखरच वरवरच्या धमकीमुळे स्वामीजींनी एक कोटी रुपये पोहोचविले की या प्रकरणाला आणखी कोणता आयाम आहे का? याचीही चौकशी करावी लागणार आहे.