लोकमान्यकडून विद्यार्थ्यांना 1 कोटीची देणगी
नाशिकच्या भोंसला मिलिट्री स्कूलच्या विद्यार्थ्यांना व्याजातून शिष्यवृत्ती
नाशिक : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड नेहमीच राष्ट्रविकास मूल्याला महत्त्व देते. किंबहुना हा लोकमान्यच्या कामाचा अविभाज्य भाग मानते. हीच परंपरा कायम राखत लोकमान्यकडून सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या (भोंसला) नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी 1 कोटींची देणगी जाहीर केली आहे. यावेळी लोकमान्यच्या संचालिका सई ठाकुर-बिजलानी, लोकमान्यचे सल्लागार प्रीतम बिजलानी, नाशिक क्षेत्रिय व्यवस्थापक हेमंत फडके, बांधकाम व्यावसायिक श्वेता कोठारी, भोंसलाचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश भिडे, सचिव हेमंत देशपांडे, सहसचिव माधव बर्वे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. दरवर्षी गुणवंतांच्या यादीत पहिला येणारा आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना या देणगीच्या व्याजातून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याबाबतच्या कार्यालयीन कागदपत्रांची पूर्तता नुकतीच करण्यात आली. भोंसलाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत धनादेश सुपूर्द केला. आगामी वर्षांपासून ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
या शिष्यवृत्तीबाबत लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी सांगितले की, ‘भोंसलामध्ये देशाची युवा पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य यशस्वीरीत्या होत आहे. या कार्यात आपलाही सहभाग असावा या विचारांतून लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) डी. बी. शेकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. यामुळे गरजू विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. त्यांच्या प्रगतीचा मार्ग सुकर होणार आहे. अभ्यास करताना फी भरण्याचा असलेला ताण कमी होईल. सोबतच लोकमान्यचे भारतीय लष्करासोबत जिव्हाळ्याचे नाते आहे. लष्करात कार्यरत असलेल्या आजी-माजी जवान, शहीद जवानांच्या पत्नी यांना लोकमान्यचे ठेवीदार केल्यानंतर अर्धा टक्का अधिक व्याज दिले जाते. या शिष्यवृत्तीमुळे हे नाते नक्कीच अधिक दृढ होत आहे,’ असे किरण ठाकुर यांनी स्पष्ट केले. लोकमान्यच्या संचालिका सई ठाकुर-बिजलानी म्हणाल्या, ‘देशाच्या विकासात लोकमान्यने नेहमीच आपली जबाबदारी उचलली आहे. याआधीसुद्धा अनेक माध्यमातून लोकमान्य जनसेवा करत आली आहे. बेळगावमधील मराठा लाईट इन्फंट्री संग्रहालयाचे संवर्धन, शिवाजी महाराज पुतळा उभारणी, रुग्णवाहिका या स्वरुपात लोकमान्यने नेहमीच मदत केली आहे. या माध्यमातून लोकमान्यला लष्कराची सेवा करण्याची संधी मिळत असते, अशी आमची भूमिका आहे.’
देशाच्या विकासात लोकमान्यचा सहभाग
- लोककल्प फौंडेशनच्या निर्मितीतून कार्य
- दुर्गम भागातील 32 खेड्यांचे घेतले पालकत्व
- महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर भर