क्रेडीट कार्डच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये 1.76 लाख कोटीचा खर्च
उत्सवी काळात वस्तुंच्या मागणीत वाढीचा परिणाम : खर्चात 25 टक्के वाढ
नवी दिल्ली :
उत्सवी काळात विविध वस्तुंच्या वाढीव मागणीमुळे सप्टेंबर महिन्यात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या खर्चामध्ये 25 टक्के वाढ दिसून आली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 1.76 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यातली ही सर्वात मोठी वृद्धी आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने या बाबतची माहिती दिली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये पहिल्यांदाच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारा खर्च 20 टक्के अधिक झाला होता. एक वर्षाआधी सप्टेंबर महिन्यात 1.42 लाख कोटी खर्च करण्यात आले होते. ऑगस्ट 2024 मध्ये पाहता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 1.68 लाख कोटी खर्च करण्यात आले होते.
उत्सवी हंगामामुळे वृद्धी
उत्सवी काळामध्ये ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात वस्तुंची मागणी नोंदविण्यात आली होती. ईएमआय सारख्या सवलतीच्या योजनांचा फायदा ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उचलल्याचे पहायला मिळाले. या व्यवहारांसाठी बहुतेक ग्राहकांनी क्रेडिट कार्डचा वापर केल्याचे पाहायला मिळाले. हाच खर्चाचा ट्रेंड चालू ऑक्टोबर महिन्यातही वाढीव राहू शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे.
काय म्हणाले होते गव्हर्नर
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास अलीकडेच म्हणाले होते की, उत्सवी हंगामामध्ये विविध गोष्टींची मागणी वाढीव राहण्याची शक्यता असून त्यातून आर्थिक वृद्धी चांगली राहणार आहे. भारताची अर्थव्यवस्था उत्तम प्रदर्शन करत असून खासगी क्षेत्रातल्या काही बँका जुलै ते सप्टेंबर या कालावधीत क्रेडिट कार्ड व या सोबतच वित्त कर्ज देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे.
एचडीएफसी आघाडीवर
क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात नेहमीप्रमाणे एचडीएफसी बँक ही आघाडीवर राहिली आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सर्वाधिक खर्च एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डामार्फत करण्यात आल्याचे सांगितले जाते. सप्टेंबरमध्ये 52 हजार 226 कोटी रुपयांचा खर्च क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये 38 हजार 661 कोटी रुपये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करण्यात आले होते. दुसरीकडे दुसऱ्या नंबरवर एसबीआय बँक असून 27 हजार 714 कोटी रुपये यांच्या क्रेडिट कार्डमार्फत खर्च करण्यात आले आहेत. आयसीआयसीआय बँक तिसऱ्या क्रमांकावर राहिली असून क्रेडिट कार्डच्या खर्चाच्याबाबतीत सप्टेंबरमध्ये 24 टक्के वाढ नोंदवली आहे. 31 हजार 457 कोटी रुपये यांच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्चण्यात आले आहेत. यानंतर अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डमार्फत 18 हजार 721 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.