होम आयसोलेशन 20 टक्क्यांवर आणणार!
- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात सध्या 40 ते 50 टक्के रूग्ण होम आयसोलेशनचे आहेत. मात्र होम आयसोलेशनमधील रूग्ण अधिक त्रास झाल्यानंतरच उपचारासाठी रूग्णालयात दाखल होतात, तोपर्यंत काहीवेळा गंभीर स्थिती झालेली असते. रुग्णांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे होम आयसोलेशनचे प्रमाण कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिह्यात होम आयसोलेशनचे प्रमाण 20 टक्क्यांवर आणण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा कोरोनाच्या रेड झोनमध्ये असून जिल्हय़ात मृत्यूदरही 3.20 टक्के झाला आहे. रूग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी मृत्यूदर वाढताच आहे. याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता होम आयसोलेशनमधील रूग्ण नियम पाळत नसल्याची बाब समोर आली आहे. अधिक त्रास झाल्यानंतरच रूग्ण रूग्णालयात दाखल होतात. त्यामुळे होम आयसोलेशनचे प्रमाण 20 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात सध्या 1 हजार 456 रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सध्या दररोज 300 ते 400 नवे रूग्ण आढळून येत आहेत. गेल्या आठवडय़ापासून रूग्णसंख्येतील वृध्दीदरात काही प्रमाणात घट झाली असून मृत्यूदर मात्र कमी झालेला नाही. मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने होम आयसोलेशनवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना कोणताही त्रास अथवा लक्षणे नाहीत, मात्र कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आहे, अशांनाच होम आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे. तसेच होम आयसोलेशनमधील रूग्णांचा नियमांच्या अंमलबजावणीबाबत कर्मचाऱयांमार्फत पाठपुरावा केला जाणार असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.
त्रास होण्याआधीच रूग्णालयात दाखल व्हा!
होम आयसोलेशनमधील रूग्ण घराबाहेर फिरत असल्याच्या घटनाही समोर आल्या असून ही चिंताजनक बाब असून नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. याचा त्रास रुग्ण व त्याच्या कुटुंबालाच सर्वाधिक होईल, कोणतीही लक्षणे अथवा त्रास तीव्र होण्याआधीच रूग्णालयात दाखल होण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून करण्यात आले आहे.