हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय रडारवर
ईडीचे 12 ठिकाणी छापे: पश्चिम बंगाल-राजस्थानमध्येही तपास
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळच्या अनेक व्यावसायिकांवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी बुधवारी झारखंडमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी सध्या विनोद कुमार नामक संशयिताचा कसून शोध घेत आहेत. तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे मीडिया सल्लागार ईडीच्या रडारवर आहेत. त्याच अनुषंगाने बुधवारी एकाचवेळी विविध ठिकाणी छापासत्र सुरू करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार पिंटू उर्फ अभिषेककुमार प्रसाद यांना अटक करण्यात आली आहे. रतू रोड येथील अभिषेक कुमार यांच्या घरावरही ईडी छापेमारी उशिरापर्यंत सुरू होती. कडक सुरक्षाव्यवस्थेत ही कारवाई सुरू असताना घराचे कुलुप तोडून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. याचदरम्यान रांची येथे राहणाऱ्या रोशन नावाच्या आरोपीच्या घरावरही ईडीने छापेमारी केली आहे. तसेच झारखंडव्यतिरिक्त राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्येही याच प्रकरणाशी संबंधितांवर छापे टाकण्यात आले.
झारखंडमधील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित प्रकरणात, तपास यंत्रणा ईडीचे एक पथक शोध मोहिमेसाठी साहेबगंजच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडेही पोहोचले आहे. राम निवास असे साहेबगंजच्या उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. राम निवास हा मूळचा राजस्थानचा आहे. शोध मोहिमेसाठी झारखंडच्या साहेबगंजमध्ये कार्यरत डीएसपी राजेंद्र दुबे यांच्या निवासातही ईडीची टीम पोहोचली होती. डीएसपी राजेंद्र दुबे हे मूळचे हजारीबागचे रहिवासी आहेत. झारखंडमधील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणा ईडीकडून शोध मोहीम सुरू आहे. झारखंडमधील राजकीय घडामोडींदरम्यान ईडीची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.