हूतींच्या रडारवर नाही भारत!
लाल समुद्रातील हल्ल्यांमुळे भारताचे नुकसान : जयशंकर यांची इराणच्या नेतृत्वाशी चर्चा
वृत्तसंस्था/तेहरान
येमेनमधील हुती बंडखोरांना इराणचे समर्थन प्राप्त असून ते पाश्चिमात्य देशांच्या विरोधात हल्ले करत आहेत. भारत थेट स्वरुपात हूतींच्या रडारवर नसल्याचे एका गुप्तचर अहवालातून समोर आले आहे. हुती बंडखोरांकडून भारतीय जहाजांना लक्ष्य न करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. इराणचे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि हिजबुल्लाहकडून हुती बंडखोरांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच इराणकडूनच हुती बंडखोरांना ड्रोन्स, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs आणि इतर शस्त्रास्त्रs पुरविली जात आहेत.
हुती बंडखोरांकडून लाल समुद्रात होत असलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक व्यापारासमोर अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच या हल्ल्यांबद्दल भारत आणि चीनने चिंता व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरून दोन्ही देश अमेरिकेसोबत जातील अशी भीती आता इराणला सतावू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर विदेशमंत्री एस. जयशंकर हे इराणच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत.
इराणच्या राष्ट्रपतींची घेतली भेट
जयशंकर यांनी इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि विदेशमंत्री हुस्सैन अमरी-अब्दुल्लाहिन यांची भेट घेतली आहे. भारताच्या आसपास जहाजांवर होणारे हल्ले आंतरराष्ट्रीय समुदायासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. याचा भारताच्या ऊर्जा आणि आर्थिक हितांवर थेट प्रभाव पडतो. भारत नेहमीच दहशतवादविरोधात उभा राहिला आहे, परंतु कुठल्याही तणावाच्या स्थितीत सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा केली जावी अशी भूमिका जयशंकर यांनी यावेळी मांडली आहे. लाल समुद्राच्या मार्गे 15 टक्के जागतिक व्यापार होत असतो. हुतींच्या हल्ल्यांमुळे युरोप आणि आशियातील मुख्य सागरी मार्गावरील आंतरराष्ट्रीय व्यापाराला धक्का पोहोचला आहे.
चाबहार बंदरावर चर्चा
जयशंकर यांच्या या दौऱ्यादरम्यान चाबहार बंदर आणि आयएनएसटीसी कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टवरून (इराणला रशियाशी जोडणारा कॉरिडॉर) इराणच्या नेतृत्वासोबत चर्चा झाली आहे. इराण आणि भारत यांच्यात 2018 मध्ये चाबहार बंदरावरून करार झाला होता. हे बंदर पाकिस्तानातील ग्वादार बंदरापासून केवळ 170 किलोमीटर अंतरावर आहे. ग्वादार बंदर हे चीन-पाकिस्तानच्या सीपॅक प्रकल्पाचा हिस्सा आहे. 2019 मध्ये अमेरिकेने इराणवर निर्बंध घातल्याने चाबहार बंदर प्रकल्पाचे काम रखडले होते.