हजारो ससे असणारे ‘रॅबिट आयलँड’
प्रत्येक देशात काही अशा जागा नक्की मिळतील, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहित असते. अशा ठिकाणांशी निगडित स्वतःची एक वेगळी कहाणी असते. जगात अनेक सुंदर आणि अनोखी बेटे आहेत. ही बेटं स्वतःच्या वैशिष्टय़ांमुळे पर्यटकांना आकर्षित करत असतात. असेच एक अनोखे बेट असून तेथे केवळ सशांचे वास्तव्य आहे. याचमुळे या बेटाला रॅबिट आयलँड या नावाने ओळखले जाते. जपानच्या ओकुनोशिमा बेट तसे पाहिल्यास अत्यंत सुंदर असून लोक तेथे फिरण्यासाठी येत असतात.
1929 आणि 1945 दरम्यान जगापासून लपवून जपानने एक विषारी वायू तयार केली होता. हा विषारी वायू सुमारे 6 हजार टन इतक्या प्रमाणात तयार करण्यात आला होता. वायूचा प्रभाव पाहण्यासाठी या बेटावर सशांना आणले गेले होते. काळासोबत येथील सशांच्या संख्येत वाढ होऊ लागली. आता या बेटावर हजारोंच्या संख्येत ससे आहेत.
तर एका अन्य कहाणीनुसार 1971 मध्ये काही शालेय मुले येथे पिकनिकसाठी आली होती. या मुलांनी स्वतःसोबत 8 ससे आणले होते. आज याच सशांची संख्या वाढून हजारांमध्ये पोहोचली आहे. या बेटावर सशांची शिकार देखील होत नाही. या बेटावर श्वान तसेच मांजरांसारखे प्राणी आढळत नाहीत. या बेटावर श्वान-मांजर आणण्यावर बंदी आहे. या बेटावर आता पर्यटकांसाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट देखील खुले झाले आहे.
या बेटावर आता एक गोल्फकोर्स देखील तयार करण्यात आले आहे. 1988 मध्ये येथे एक संग्रहालय सुरू करण्यात आले, याद्वारे अधिकाधिक लोकांना विषारी वायूबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो संग्रहालयात वायूच्या प्रभावाला छायाचित्रांच्या माध्यमातून दर्शविण्यात आले आहे.