सारस पक्ष्याला वाचविण्यासाठी अनोखे अभियान
भारतीय सारस पक्षी ही प्रजाती दुर्मीळ होत चालली आहे. अद्याप तिचा समावेश दुर्मीळ गटात करण्यात आला नसला तरी दरवषी या सारसांची संख्या कमी होताना दिसत आहे. विलुप्त होण्याच्या मार्गावर असणाऱया या प्रजातीला वाचविण्यासाठी चार तरुण पुढे आले आहेत. या पक्ष्याचे वास्तव्य प्रामुख्याने राजस्थानातील भरतपूर जिल्हय़ामध्ये आहे. सारस पक्षी कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण शेतकऱयांकडून त्यांच्या घरटय़ांचा होणारा नाश, हे आहे.
या कारणावर उपाय म्हणून हे चार तरुण शेतकऱयांचे प्रबोधन करीत आहेत. सारसाच्या एका घरटय़ाच्या मोबदल्यात ते शेतकऱयाला एक पोते गव्हाची किंमत देतात. तांदळाबाबतही ते असेच करतात. यामुळे अनेक शेतकऱयांनी सारस पक्ष्यांची घरटी वाचविलेली आहेत. सारस पक्षी सहसा धान्य खात नाही. त्याचा आहार टोळ, छोटे किडे, अळय़ा, छोटे सरपटणारे प्राणी आणि मासे असा आहे. त्यामुळे शेतकऱयाला सारस पक्ष्याचा लाभच होतो. धान्यावरची किड आणि अळय़ा तो खाऊ शकतो. शेतकऱयांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी सारस पक्ष्याची घरटी पाडण्याचे बंद केले आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षांमध्ये भरतपूरमध्ये सारस पक्ष्यांच्या संख्येत 10 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार वर्षात अशाप्रकारे 36 शेतकऱयांनी अनेक सारस पक्षी वाचविले आहेत. या 36 शेतकऱयांना या तरुणांनी पैसे दिले आहेत. शेतकरी सारसाची घरटी का पाडतात, याचेही कारण आहे. सारस पक्षी शेतात उगवलेली गव्हाची रोपटी उखडून त्यापासून आपले घरटे बनवितात. त्यामुळे शेतकऱयांची हानी होते. आता या हानीच्या मोबदल्यात त्यांना पैसे मिळत असल्यामुळे ते गव्हाच्या काही रोपटय़ांची चिंता करत नाहीत. अशा प्रकारे एका कल्पक अभियानाद्वारे सारसांना जीवदान लाभत आहे.