साताऱयात दीपावली आगमनाचा उत्साह शिगेला
खरेदीसाठी नागरिकांची धावपळ - पारंपारिक वस्तुंनाही ग्राहकांची पसंती
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात कोरोना संसर्ग कमी होवू लागला असून गतवर्षीपेक्षा यावर्षी साताऱयातील दीपावली आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नवनवीन कपडय़ांसह, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर दीपावली साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठा ओसंडून वाहू लागल्या आहेत. दिवाळी तीन चार दिवसांवर येवून ठेपलेली असताना बाजारपेठेत यावर्षी खरेदीला उधाण आले आहे.
साताऱयातील बाजारपेठांमध्ये आकाश कंदील, पणत्या विविध प्रकारच्या सजावटीचे साहित्य, दिवे व रांगोळे, रंग यांना मागणी वाढली आहे. साताऱयातील बाजारपेठ ग्राहकांच्या पसंतीच्या वस्तूंनी बहरुन गेली सध्याच्या चायना मेड व इन्स्टंटच्या जमान्यात पारंपारिक पध्दतीने बनवण्यात येत असलेल्या आकाश कंदिलांला साताऱयात ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत नागरिक खरेदी करत आहेत.
दिवाळी म्हटले की आकाश कंदिलाची खरेदी महत्त्वाची असते. दिवाळीसाठी दर वेळी काही नवनव्या डिझाइनचे आकाश कंदील बाजारात पाहायला मिळतात. या वेळी पारंपारिक आकाश कंदिलाबरोबरच नवनवे आकर्षक डिझाइन पाहायला मिळतात. परंतु, आकाश कंदिलाच्या खरेदीपेक्षा आकाश कंदिलाच्या साहित्य खरेदीकडे कल अधिक आहे.
शाळांतूनही विद्यार्थ्यांना आकाशकंदिल बनवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे मुलांचाही आकाश कंदील तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग वाढतो आहे. बाजारातून आकाश कंदिलाचे साहित्य आणले जात आहे. यात रंगीत कागद, लेस आदी साहित्याची मागणी वाढली आहे. मात्र, चायना, इन्स्टंटचा जमान्यात पारंपरिक आकाश कंदील अजुनही टिकून असल्याचे दिसून येत आहे.
सातारा शहर व परिसरात सध्या दिवाळी साठी बाजारपेठ सजली असून अनेक रंगबिरंगी आकाश कंदील बाजारात लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत त्यात मेड इन चायना आयटमने बाजारपेठ काबीज केली असताना मणेर अँड सन्सने गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने लाकडी कामटय़ा, चिरमुरे पेपरने बनवले जाणारे आकाश कंदील बनविण्याची परंपरा टिकवून ठेवली आहे. त्यांच्याकडे पारंपारिक आकाश कंदिल घेण्यासाठी ग्राहक येत आहेत.
बाजारपेठेत कोटय़वधी रुपयांची उलाढाल
दीपावलीवर कोरोनाचे सावट असले तरी यावर्षी अनलॉक झाल्याने व्यापारी वर्गांनी दीपावलीचा माल मोठया प्रमाणावर भरला आहे. कापड मार्केट, फ्रीज, एलसीडी, मोबाईलबरोबरच दीपावलीसाठी लागणाऱया तयार फराळांच्या पदार्थांची मार्केटमध्ये रेलचेल असून खरेदीसाठी नागरिक मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडत असल्याने कोटय़वधी रुपयांची उलाढाल सुरु आहे.
ऑनलाईन खरेदीलाही ग्राहकांची पसंती
दीपावलीच्या निमित्ताने खरेदी करताना साताऱयातील ग्राहकांकडून विविध कंपन्यांच्या वेबसाईटवरुन दीपावलीसाठी लागणाऱया वस्तू, कपडे, मोबाईलसह अनेक वस्तूंची मागणी वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर सध्या विविध कुरिअरचे डिलिव्हरी करणारे पाठीवर मोठय़ा मोठया बॅगा भरुन ग्राहकांचे साहित्य त्यांना घरपोहोच देताना दिसत आहेत.
किल्ले बनवण्यात बालगोपाळ मग्न
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हा इतिहासाचा प्रेरणादायी ठेवा. या किल्ल्यांचे आकर्षण दीपावलीच्या माध्यमातूनच बालमावळय़ांना वाटू लागते. लहानपणातील ही किल्ले बनवण्याची मेहनतही खूप वेगळा आनंद देणारी असते. साताऱयातील विविध पेठांमध्ये नुकत्याच सुरु झालेल्या शाळांना सुट्टी लागल्याने बालमावळे किल्ले तयार करण्यात मग्न आहेत. किल्ल्यावर लागणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोटय़ा पुतळय़ासह विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य सध्या राजवाडा चौपाटीवर विक्री होत आहे.