सातारा पालिकेच्या सभा आता होणार ऑफलाईन
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना काळात जिह्यात एकमेव नगरपालिका असेल की ऑफलाईन बैठका घेतल्या गेल्या नाहीत. ऑनलाईन बैठका घेण्यासाठी सुरुवातीच्या काळात इंटरनेटची समस्या भेडसावली होती. परंतु त्यानंतरच्या ऑनलाईन सभांमध्ये सर्वच नगरसेवकांना सभेत बोलता येत नव्हते. आता 22 ऑक्टोबरला नगरविकास विभागाचे अव्वर सचिवाचे पत्र पालिकेत धडकले अन् आता सातारा नगरपालिकेच्या सभा तब्बल 18 महिन्यांनंतर ऑफ लाईन अशा होणार आहेत. मात्र, शासनाकडून पत्र जरी आले असले तरीही सत्ताधाऱयांकडून अद्याप कोणत्याही विषय समितीती ऑफ लाईन सभेचा अजेंडा किंवा सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला गेला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभा या दर महिन्याला होतात. तसा नियम आहे. विकास कामाच्या अनुषंगाने विषय समितीच्या सभांसह सर्वसाधारण सभा काढणे आणि ते घेणे गरजेचे आहे. असे जाणकरांचे मत आहे. सध्या विद्यमान असलेल्या नगरसेवकांची मुदत संपत आलेली आहे. त्यामुळे निवडणूका लागण्यापूर्वी जास्तीत जास्त सभा होवून विकास कामांचा धडाका होणे अपेक्षीत असते. वॉर्डावॉर्डात कामे मंजूर करुन विकास करण्याचा मनोदय प्रत्येक नगरसेवकांचा आहे. परंतु कोरोनामुळे गेली अठरा महिने शासनानेच ऑफलाईन मिटिंग घेण्यास मनाई केली. मार्च 2019 मध्ये ऑफलाईन सभा झाल्या होत्या. तेव्हाच लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वच बंद झाले. त्यानंतर दुसऱया लाटेपूर्वी मिटींग घेण्यास परवानगी दिली ती ऑनलाईन अशी. परंतु सातारा पालिकेमध्ये नेटवर्कची समस्या असल्याने सुरुवातीला बैठका झाल्या नाहीत. पुन्हा नेटवर्कसाठी नेट कनेक्शन वेगळय़ा कंपनीचे घेण्यात आले अन् सभा घेण्यात आल्या. त्यावेळी नविआच्यावतीने सभा ऑफलाईन शाहु कला मंदिरात घेण्यात याव्यात असे पत्र देण्यात आले होते. नगराध्यक्षा माधवी कदम यांनीही राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे सभेकरता परवानगी द्यावी असे पत्र पाठवले होते. परंतु शासनाकडून परवानगी दिली नाही त्यामुळे ऑनलाईनच बैठका घेण्यात येत होत्या. त्यानुसार सातारा पालिकेची शेवटची ऑनर्लान स्थायी समितीची सभा ही दि. 27 ऑगस्टला तर त्यानंतर दि. 3 फेब्रुवारीला सर्वसाधरण सभा घेण्यात आली होती. त्यानंतर सभाच झालेली नाही. आता मात्र शासनाकडूनच नगरविकासचे अव्वरसचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांचे सर्वच महाराष्ट्रातील पालिकांना पत्र आले आहे की ऑफलाईन सभा घेण्यात यावेत. हे पत्र 22 ऑक्टोबरला आले असून अद्यापही सातारा पालिकेत ऑनलाईन बैठकीसाठी हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱयांच्या विरोधात नगरविकास आघाडीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
लवकरच सभा घेवू
आमच्या आघाडीचे नेते खासदार श्री. छ. उदयनराजें यांच्या सुचनेनुसार आम्ही लवकरच ऑफलाईन सभा घेवू. त्याकरता सातारा विकास आघाडीचा प्रयत्न सुरु आहे. ऑफलाईन सभा घेण्यात येणार आहेत.
माधवी कदम नगराध्यक्षा
लवकरच ऑफलाईन सभा घेण्यात याव्यात सातारा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने सातारा विकास आघाडीने दि. 22 ऑक्टोबरच्या नगरविकास विभागाच्या पत्रानुसार सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात. विकास कामे करण्यासाठी सभा घेतल्या पाहिजेत. सभा घेतल्या तरच सातारकरांच्या प्रश्नांची सोडवणूक होईल.