For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सलग पाचव्या विजयासह इंग्लंड अंतिम फेरीत

06:00 AM Apr 01, 2022 IST | Tarun Bharat Portal
सलग पाचव्या विजयासह इंग्लंड अंतिम फेरीत
Advertisement

आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक : डॅनी वॅटचे तडाखेबंद शतक, सोफी इक्लेस्टोनचे अवघ्या 36 धावात 6 बळी, जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी रंगणार निर्णायक लढत

Advertisement

वृत्तसंस्था /ख्राईस्टचर्च

डॅनी वॅटचे तडाखेबंद शतक आणि सोफी इक्लेस्टोनने मिळविलेल्या 36 धावातील 6 बळींच्या जोरावर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 137 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवत आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. वॅटने 125 चेंडूत 12 चौकारांसह 129 धावांची आतषबाजी केल्यानंतर इंग्लंडने निर्धारित 50 षटकात 8 बाद 293 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 156 धावांमध्येच खुर्दा झाला.

Advertisement

129 धावांची शतकी खेळी साकारणाऱया वॅटला तब्बल पाच जीवदाने लाभली आणि याचा पुरेपूर लाभ घेत तिने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर जोरदार वर्चस्व गाजवले. वॅटला सोफी डंकलीची उत्तम साथ लाभली. डंकलीने 72 चेंडूत 4 चौकारांसह 60 धावांचे योगदान दिले.

दक्षिण आफ्रिकेचा संघ साखळी फेरीअखेर दुसरे स्थान संपादन करत उपांत्य फेरीत पोहोचला होता. शिवाय, स्पर्धेतील भारताचे आव्हान देखील याच संघाने संपुष्टात आणले होते. मात्र, येथे इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत ते दडपणाखाली ढेपाळले आणि यानंतर त्यांना एकतर्फी फरकाने पराभव पचवावा लागेल, हे साहजिकच होते.

विजयासाठी 294 धावांचे तगडे आव्हान असताना दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेतील सर्वाधिक धावा जमवणारी लॉरा वुलव्हार्ट दुसऱयाच षटकात बाद झाली आणि येथूनच त्यांच्या पडझडीला जोरदार सुरुवात झाली. वुलव्हार्टची सहकारी सलामीवीर लिझेले ली ही श्रबसोलचे दुसरे सावज ठरली. लिझेलेने फ्लिक करण्याच्या प्रयत्नात मिडविकेटकडे सोपा झेल दिला. केट क्रॉसने सुने लूसला बाद करत आणखी एक अडसर दूर केला. त्यानंतर ठरावीक अंतराने ही पडझड कायम राहिली आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव 38 षटकात अवघ्या 156 धावांमध्येच गारद झाला.

डावखुरी फिरकीपटू सोफी इक्लेस्टोनने विशेषतः तळाची फलंदाजी लाईनअप गारद करण्यात सिंहाचा वाटा उचलला. तिने 8 षटकात 36 धावांमध्येच 6 बळी घेतले. पाच किंवा त्याहून जास्त बळी मिळविण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय, तिने फलंदाजीत 11 चेंडूत नाबाद 24 धावा फटकावल्याने इंग्लंडला 300 धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले होते.

3 पराभवानंतर सलग 5 विजय संपादन करत इंग्लंडचा संघ आता अंतिम फेरीत पोहोचला असून रविवार दि. 3 रोजी हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेतेपदासाठी मुकाबला करेल. इंग्लिश संघासमोर यंदा पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य असणार आहे.

आजच्या उपांत्य लढतीत निर्णायक वेळी आमच्या खेळाडूंनी आपले सर्वोत्तम योगदान दिले आणि त्यामुळे सहजपणे अंतिम फेरीत धडक मारता आली. आता अंतिम फेरीत आम्ही अंडरडॉग्ज असणार आहोत. मागील काही आठवडय़ांनी अव्वल खेळ साकारण्यात यश मिळाले आता शेवटचा एक धक्का देणे, हीच आमची महत्त्वाकांक्षा असेल!

-इंग्लंडची कर्णधार हिदर नाईट

आज आम्ही सर्वोत्तम खेळ साकारणे आवश्यक होते. पण, प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही. तंत्रशुद्ध खेळ प्रत्यक्षात उतरवला असता तर वेगळे चित्र दिसून आले असते. अद्याप आम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल. आमच्यासाठी या स्पर्धेतील अनुभव उत्तम होता, याचा मी आवर्जून उल्लेख करेन.

-दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लूस.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : 50 षटकात 8 बाद 293 (डॅनी वॅट 125 चेंडूत 12 चौकारांसह 129, सोफिया डंकली 72 चेंडूत 4 चौकारांसह 60, ऍमी जोन्स 33 चेंडूत 3 चौकारांसह 28, सोफी इक्लेस्टोन 11 चेंडूत 5 चौकारांसह 24. अवांतर 20. शबनीम इस्माईल 10 षटकात 3-46, मेरिझेन कॅप्प 2-52, मसाबाता क्लास 2-55, अयाबोंगा 1-66).

दक्षिण आफ्रिका : 38 षटकात सर्वबाद 156. (मिग्नॉन डय़ू प्रीझ 48 चेंडूत 2 चौकारांसह 30, लारा गुडॉल 49 चेंडूत 4 चौकारांसह 28, सुने लूस 24 चेंडूत 2 चौकारांसह 21, मेरिझेन कॅप्प 28 चेंडूत 2 चौकारांसह 21, त्रिसा शेट्टी 28 चेंडूत 1 चौकारांसह 21. अवांतर 15. सोफी इक्लेस्टोन 8 षटकात 36 धावात 6 बळी, अन्या श्रबसोल 2-27, केट क्रॉस, चार्ली डीन प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.