सरकारवर मतदारांची माहिती चोरीचा आरोप
काँग्रेस नेत्यांकडून सरकारवर ठपका : मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांकडून आरोपांचा इन्कार
प्रतिनिधी /बेंगळूर
मतदारांची जागृती करण्याच्या नावाखाली मतदारांची माहिती चोरीचा प्रयत्न करणारे भाजप सरकार लोकशाही व्यवस्थाच हायजॅक करण्यास सरसावले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. चेलुमे ट्रस्ट या संस्थेने बेंगळूरमधील मतदारांची यादी बेकायदेशीरपणे जमविली आहे. यामागे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
कर्नाटक काँग्रेस राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत सरकारवर मतदारांची माहिती चोरीचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे बेंगळूर जिल्हा पालकमंत्री आहेत. त्यांनी चेलुमे शिक्षण संस्थेने मतदारांची माहिती जमा करण्याची परवानगी मागितही होती. सुरुवातीला महादेवपूर मतदारसंघात माहिती जमा करण्याची परवानगी देण्यात आली होती. डीएपी होंबाळे प्रा. लि., चेलुमे संस्थेने माहिती जमविली आहे. दोन्ही संस्थांचे संचालक एकच आहेत. ही मतदारांची फसवणूक आहे. मतदारांची माहिती उघड होण्यास बेंगळूर महापालिका आणि मुख्यमंत्री बोम्माई कारणीभूत आहेत, असा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
मतदारांकडून जमा केलेली माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली नाही. डिजिटल सर्वेक्षण अॅपवर अपलोड करण्यात आली आहे. कृष्णप्पा, रविकुमार हे या प्रकरणाचे प्रमुख किंगपीन आहेत. ते एका विद्यमान मंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. एका खासगी संस्थेला मतदारांची माहिती जमाविण्याची परवानगी देणे गुन्हा नव्हे काय?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचे आरोप निराधार : बोम्माई
मतदारांच्या आकडेवारीविषयी एक खासगी संस्था बेकायदेशीरपणे माहिती जमा करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी हा आरोप निराधार असून काँग्रेसने तक्रार करावी. त्यानंतर चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. मतदार यादीच्या नूतनीकरणाचे काम निवडणूक आयोग, बेंगळूर महानगरपालिका एनजीओकडे सोपवितात. 2018 मध्ये काँग्रेसचे सरकार असताना हे काम सोपविण्यात आले होते. मात्र काँग्रेस नेते आपल्यावरच आरोप करून राजीनामा मागत आहेत. मतदारांची माहिती जमा करण्याचा मुद्दा निवडणूक आयोग, बेंगळूर महानगरपालिका आणि एनजीओशी संबंधित आहे. त्यासंबंधी गुन्हा दाखल करण्याची सूचना बेंगळूर महापलिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांमध्ये बुडालेल्या काँग्रेस नेत्यांनी कोणतेही काम नाही. त्यामुळे ते कोणत्यातरी होंबाळे नामक संस्थेचे नाव समोर करून आपल्यावर निराधार आरोप करीत आहेत. आपली बदनामी करण्याचे कारस्थान रचणाऱ्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशारा मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिला आहे.
चेलुमे’ची परवानगी रद्द
बेंगळूर महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक घराला भेट देऊन ऑनलाईन किंवा व्होटर हेल्पलाईन अॅपद्वारे अर्ज दाखल करण्यासाठी जनतेत जागृतीसाठी चेलुमे’ या संस्थेला परवानगी देण्यात आली होती. मात्र, या संस्थेने अनुमतीपत्रामध्ये दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे या संस्थेला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे.