सदोष मनुष्यवधप्रकरणी आरोपीस 6 वर्ष सक्तमजुरी
प्रतिनिधी/ सातारा
जुनी भांडणे व शेतातील विहिरीवरून अमोल रामचंद्र सुतार व त्याचे चुलते हणमंत सुतार यांच्यात वाद सुरू होता. या वादाचा राग मनात धरून आरोपी अमोल सुतारने हणमंत सुतार यांना चाकूने भोकसून गंभीर दुखापत करत खून केला होता. या खूनाबद्दल आरोपी अमोल रामचंद्र सुतार (वय 28, रा. आसु ता. फलटण) ला 6 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एम. शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले हेते. या खटल्याच्या सुनावणीत 12 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने निर्भीडपणे साक्ष दिली. या खटल्यात परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी अमोल सुतार याला सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी धरून शुक्रवार दि. 31 रोजी 6 वर्ष सक्तमजूरी व 5 हजार रूपये दंड, हा दंड न दिल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उर्मिला घार्गे, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, सुधीर खुडे, गजानन फरांदे, महिला पोलीस नाईक रिहाना शेख, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी तपासात योग्य ती मदत केली.