महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सत्ताधाऱयांना माज, कार्यकर्ते नाराज

06:30 AM Aug 05, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्नाटकात सध्या भाजप विरुद्ध त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असे चित्र पाहायला मिळते आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर गेल्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तेच कार्यकर्ते आज आपल्याच नेतृत्वाविरुद्ध उभे ठाकले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जी टीका काँग्रेस आणि निजदच्या नेत्यांनी करायला हवी त्याहीपेक्षा कठोर शब्दात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारविरुद्ध रान उठविले आहे. परिस्थिती अशीच कायम राहिली तर आगामी निवडणुकीत भाजपला टार्गेट 150 गाठणे कठीण जाणार आहे. केंद्रीय नेतृत्वाने कर्नाटकातील या घडामोडी गांभीर्याने घेतल्या आहेत.

Advertisement

मंगळूर जिल्हय़ात गेल्या महिन्यात एका पाठोपाठ एक तीन तरुणांचे मुडदे पडले. 19 जुलै रोजी मसूद नामक एका तरुणाचा खून झाला. यापाठोपाठ 26 जुलैला सुळय़ येथील भाजपचा कट्टर कार्यकर्ता प्रवीण नेट्टारू यांचा काटा काढण्यात आला. या हत्येचा सूड म्हणून 28 जुलै रोजी सुरतकल येथे महंमद फाजील या युवकाचा भीषण खून करण्यात आला. काँग्रेसच्या राजवटीत हिंदू संघटनांचे कार्यकर्ते व भाजप, संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली. आता केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, तरीही कार्यकर्त्यांच्या हत्या थांबल्या नाहीत, याची चीड वाढली आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तर गृहमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक मारली. प्रवीण नेट्टारू यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांनाही या संतापाला सामोरे जावे लागले. यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे, असा आरोप प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने केला आहे.

Advertisement

चक्रवर्ती सुलीबेले हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते नसले तरी संघाच्या मुशीत तयार झालेले हिंदुत्वाचे प्रमुख समर्थक आहेत. त्यांनीही उघडपणे भाजप सरकारवर टीका केली आहे. चित्रपटाचा प्रिमियर पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, तुम्हाला सत्तेपर्यंत पोहोचविणाऱया कार्यकर्त्यांच्या जीवाची काही किंमत नाही का? सिनेमात कुत्रा मेला म्हणून तुमच्या डोळय़ात अश्रू येतात, तुमच्यासाठी जिवाचे रान करणाऱया कार्यकर्त्यांचे मुडदे पाडले जातात, त्याचे तुम्हाला दुःख वाटत नाही का? अशा शब्दात चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्र्यांचा पर्यायाने सरकारचा समाचार घेतला आहे. भाजपच्या अनेक आमदारांनी ‘प्रवीण आम्हाला माफ कर, आमची सत्ता असूनही आम्ही तुला वाचवू शकलो नाही’, असे स्टेटस ठेवले. भाजप सरकारवर 40 टक्के कमिशनचा आरोप झाला. एकाही मंत्र्याने या आरोपाचा इन्कार केला नाही. सरकारचे समर्थनही केले नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना घेऊन तुम्ही सत्ता स्थापन करायला नको होती. विभिन्न विचारसरणीतून भाजपमध्ये आलेल्या लोकांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोपही भाजपवर केला जात आहे.

एकीकडे प्रवीण नेट्टारू यांच्या भीषण खुनानंतर कार्यकर्ते भडकले असताना 300 हून अधिक पदाधिकाऱयांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले असताना के. एस. ईश्वराप्पा यांच्यासारख्या नेत्यांनी ‘ज्यांना जायचे आहे, त्यांनी खुशाल बाहेर पडा, आम्हाला कार्यकर्ते भरपूर मिळतात, तुम्ही कोणत्या पक्षात जाणार’ असा सवाल उपस्थित करून त्यांना खिजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच सरकार आणि पक्षाविरुद्ध कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा भडका उडाला आहे. मंगळूर येथील हत्या सत्रानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद, गुप्तचर विभागाचे प्रमुख बी. दयानंद आदी वरि÷ अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांना चांगलेच फैलावर घेतले. प्रवीण सूद किंवा बी. दयानंद हे प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. अशा अधिकाऱयांना मुक्तपणे काम करण्याचे वातावरण कर्नाटकात आहे का? याचा विचार कोणीच केला नाही. सध्या गुन्हेगारी प्रकरणांचे तपास सत्ताधारी पक्षाचे नेते, मंत्री, आमदार जसे सांगतील त्या पद्धतीने केले जात आहेत. त्यांच्या नजरेतूनच एखाद्या प्रकरणाकडे तपास यंत्रणा पाहात असेल तर अराजक माजणार नाही तर आणखी काय होईल?

पोलीस दलात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी पोलीस दलाचा वापर करण्याची प्रवृत्ती सत्ताधाऱयांमध्ये वाढली आहे. कर्नाटकात पोलिसांची अवस्था भाजप नेत्यांनी ठेवलेल्या घरगडय़ांसारखी आहे. आपल्या इच्छेप्रमाणे पोस्टींग मिळवायची असेल तर सत्ताधारी नेत्यांची मर्जी सांभाळावी लागते. त्यासाठी त्यांचे लांगूलचालन केले जाते. त्यांच्या राजकीय विरोधकांना संपविण्याची सुपारीच खाकी वर्दीतील गुन्हेगार घेतात. इमाने इतबारे हे काम तडीस नेतात. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, कोणताही जाती-धर्माचा असो, खरोखर एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात त्याचा सहभाग असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा मुक्त अधिकार पोलीस दलाला असायला हवा. कायद्याने तो अधिकार असला तरी प्रत्यक्षात मात्र त्यांची अवस्था दयनीय आहे. जे काँग्रेसने केले नाही ते सध्या कर्नाटकात सुरू आहे. आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी पोलीस व इतर सरकारी यंत्रणेचा सर्रास गैरवापर केला जात आहे. जेणेकरून आगामी निवडणुकीत आपल्याला विरोध करणारा शिल्लकच राहू नये, असा यामागील हेतू आहे. बेळगावपासून बेंगळूरपर्यंत हीच कार्यपद्धती अवलंबली जात आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस झाला. बुधवारी दावणगेरी येथे यासाठी मोठी गर्दी जमविण्यात आली होती. काँग्रेसचे राहुल गांधी स्वतः या कार्यक्रमाला हजर होते. या वाढदिवसाच्या माध्यमातून काँग्रेसने जणू आगामी निवडणूक प्रचाराचा नारळच फोडला आहे. वेगवेगळय़ा सर्वेक्षणातून भाजप मिशन-150 गाठणे तर दूरच 100 चा आकडाही पार करणार नाही, असा निष्कर्ष बाहेर पडल्यामुळे सध्या काँग्रेसचे नेते सुखावले आहेत. भविष्यात आपलेच सरकार येणार, ही त्यांची समजूत झाली आहे. भाजप विरुद्ध उलटलेल्या कार्यकर्त्यांमुळे काँग्रेसचा उत्साह द्विगुणित झाला असला तरी पुढील मुख्यमंत्री कोण, या मुद्दय़ावर सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार समर्थकांत सुरू असलेला संघर्ष काही थांबलेला नाही. भाजप व काँग्रेसची अवस्था तर निजद नेते माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी हे सरकार कोणाचेही आले तरी आमच्याशिवाय ते सत्तेवर येऊ शकत नाही, या विश्वासात वावरत आहेत. भाजपने वेळीच कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली नाही तर स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणे नक्कीच आहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article