For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेखर सुमन, राधिका खेडा भाजपमध्ये

06:35 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेखर सुमन  राधिका खेडा भाजपमध्ये
Advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा प्रवास आता निम्म्यावर आलेला असताना भारतीय जनता पक्षात महनीयांची आवक होतच आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते शेखर सुमन यांनी मंगळवारी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत असताना, भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच काँग्रेसच्या सुप्रसिद्ध प्रवक्त्या आणि नेत्या राधिका खेडा यांनीही मंगळवारीच भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती धरले आहे.

Advertisement

सध्या गाजत असलेली वेब मालिका ‘हीरामंडी’त शेखर सुमन यांची प्रमुख भूमिका आहे. सध्या ते याच मालिकेवर लक्ष केंद्रीत करीत आहेत. त्यामुळे ते याच वेळी आपल्या राजकीय कार्यकाळाचा प्रारंभ करतील अशी शक्यता कोणाला वाटत नव्हती. मात्र, ते मंगळवारी अचानक दिल्लीत आले आणि भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात त्यांनी महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत या पक्षात प्रवेश केला. मुख्यालयात त्यांचे हार घालून स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन मी भारतीय जनता पक्षासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भविष्यात निवडणुकांच्या स्पर्धेत मी असेन की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी नंतर पत्रकारांसमोर केली.

राधिका खेडाही भाजपमध्ये

Advertisement

अनेक वर्षे काँग्रेसचे प्रवक्तेपद सांभाळलेल्या राधिका खेडा यांनीही मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अयोध्येच्या राममंदिराला मी भेट दिली आणि भगवान रामलल्लांचे दर्शन घेतले यामुळे काँग्रेसचे अनेक नेते माझ्यावर संतापले होते. या पक्षासाठी मी अनेक वर्षे कार्य केले आहे. तसेच, या पक्षाची आणि त्याच्या ज्येष्ठ नेत्यांची बाजू प्रवक्ती या नात्याने जोरकसपणे मांडली आहे. तथापि, केवळ अयोध्येतील रामलल्लांचे दर्शन घेतले म्हणून माझी अवमानना ज्या पक्षाने केली, तेथे आता मी राहणार नाही. भारतीय जनता पक्षाने शतकोटी हिंदूंचे भव्य राममंदिराचे स्वप्न साकारले आहे. त्यामुळे या पक्षात मी येत आहे, असे प्रतिपादन त्यांनी पक्षप्रवेशानंतर केले आहे.

अरविंदरसिंग लवली यांनाही भाजप प्रिय

काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पक्षाशी युती केली म्हणून संतप्त झालेल्या आणि चार दिवसांपूर्वी काँग्रेसचा त्याग केलेल्या अरविंदरसिंग लवली यांनीही रविवारी भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करणे योग्य मानले आहे. काही वर्षांपूर्वीही ते भारतीय जनता पक्षात आले होते. पण पुन्हा त्यांनी काँग्रेसचा हात हाती धरला. आता मात्र, भारतीय जनता पक्षातून कधीही बाहेर पडणार नाही, असा निर्धार त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आम आदमी पक्षाशी युती करुन काँग्रेसने दिल्लीत आपल्या पायावर आपल्याच हाताने कुऱ्हाड मारुन घेतली आहे. युती करण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घेण्याचे सौजन्य नेतृत्वाने दाखवावयास हवे होते. पण आम्हाला अंधारात ठेवण्यात आले, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.