शुभमन गिलसह आकाशदीपची ‘उंच उडी’
आयसीसी कसोटी क्रमवारीत शुभमनची मुसंडी : जो रुटने मात्र गमावला नंबर वनचा ताज
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिलने सहकारी खेळाडू ऋषभ पंतसह 15 फलंदाजांना मागे टाकले आहे. तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी क्रमवारीत (सहाव्या स्थानी) पोहोचला आहे. याच वेळी, हॅरी ब्रूकने आपलाच मायदेशी सहकारी दिग्गज फलंदाज जो रुटला मागे टाकले आहे. ब्रूक कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर रूटची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
कसोटी कर्णधार झाल्यानंतर शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 430 धावा केल्या आहेत. गिलने एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावले, तर दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. गिलच्या शानदार कामगिरीचे परिणाम म्हणजे तो कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या कसोटीनंतर, गिल 21 व्या स्थानावर होता. त्याचे रेटिंग गुण 807 पर्यंत वाढले आहेत. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी आहे. विशेष म्हणजे, आशियाबाहेर त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्राया टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. गिलने इंग्लंडमध्ये आल्यापासून दोन शतके आणि एक द्विशतक ठोकले आहे.
यशस्वी जैस्वाल चौथ्या स्थानी कायम
यशस्वी जैस्वालने आपले चौथे स्थान कायम ठेवले आहे. त्याने मालिकेच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात 87 धावांची शानदार खेळी खेळली. याशिवाय, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत एका स्थानाने घसरून सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंतने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावले आणि दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 65 धावांच्या तुफानी खेळी खेळली.
गोलंदाजीत आकाशदीपची कमाल, बुमराह अव्वलस्थानी कायम
एजबॅस्टन कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी खेळताना आकाश दीपने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून दिली. दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेत त्याने भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला होता. क्रमवारीतही त्याला या कामगिरीचा फायदा झाला आहे. कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत 39 स्थानासह उंच उडी घेत तो आता 45 व्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात 452 गुण जमा आहेत. याशिवाय, मोहम्मद सिराजनेही बर्मिंगहॅम कसोटीतील 7 विकेट्सच्या जोरावर क्रमवारीत 6 स्थानांनी सुधारणा करत 22 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात 619 गुण आहेत. तसेच 898 गुणासह जसप्रीत बुमराह कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे.
ब्रूकने दिला रुटला धक्का
आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत हॅरी ब्रूक नंबर वन कसोटी फलंदाज बनला आहे. ब्रूकने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 99 धावा केल्या तर दुसऱ्या डावात शतक झळकावले. या शानदार खेळीच्या जोरावर तो नंबर वन कसोटी फलंदाज बनला. या काळात जो रुट दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये काही खास दाखवू शकला नाही. तो मोठी खेळी खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत ब्रूकने त्याची जागा घेतली.