शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानचे आज आवळे भोजन, कालोत्सव
तळीतील नौकाविहार हे असेल खास आकर्षण
प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानचा वार्षिक कालोत्सव तथा आवळे भोजन आज रविवार 13 रोजी साजरे करण्यात येणार आहे. या उत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे वर्षातून एकदा श्री शांतादुर्गा देवी व श्री सप्तकोटिश्वर यांना एकत्र आणले जाते व पालखीत विराजमान करून वाद्यांच्या तालावर तळीच्या ठिकाणी आवळे भोजनासाठी प्रस्थान करण्यात येते. नंतर पारंपरिक धार्मिक विधी होतात.
हल्लीच सुरू करण्यात आलेला भव्य तळीतील नौकाविहार हे या उत्सवाचे आणखी एक आकर्षण बनले आहे. यावेळी कर्पुरदान करण्यात मोठय़ा प्रमाणात भाविक सहभागी होतात. दिव्यांमुळे तळी झगमगून जाते. या नेत्रदीपक क्षणाचा आनंद मोठय़ा प्रमाणात भाविक उपस्थित राहून लुटतात. तळीच्या ठिकाणी होणारे अन्नसंतर्पण हा आवळे भोजनाचा महत्वपूर्ण भाग असतो. तळीच्या ठिकाणी जेवण बनवून श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण व श्री सप्तकोटिश्वराला नेवैद्य दाखवला जातो.
या उत्सवानिमित्त सकाळी पालखीचे आगमन झाल्यानंतर तळीच्या ठिकाणी दैवतांना महाभिषेक, इतर धार्मिक विधी, आरत्या व दुपारी 1 वा. आवळे भोजन, महाप्रसाद होईल. सायंकाळी 7 वा. फुलांनी सजविण्यात आलेल्या व विद्युत रोषणाई करण्यात आलेल्या नौकेवर श्री शांतादुर्गा देवी व श्री सप्तकोटिश्वराला एकत्रित बसवून वाद्यांच्या तालावर नौकाविहार सुरू करण्यात येईल. या नेत्रदीपक क्षणाचा भाविक मनमुराद आनंद लुटतात.
नौकाविहाराच्या दहा फेऱया संपल्यावर रात्री 8 वा. महाप्रसाद होईल व पालखीचे मिरवणुकीने पुन्हा सभामंडपात आगमन होईल. रात्री 9 वा. पारंपरिक कालोत्सव, दहीहंडा होऊन उत्सवाची सांगता होईल. यंदाचे आवळी भोजन, कालोत्सव यशस्वीरीत्या व्हावा यासाठी नवीन कार्यकारिणीचे अध्यक्ष दिवाकर नाईक देसाई, सचिव संतोष नाईक देसाई, खजिनदार आनंद नाईक देसाई व मुखत्यार मंगेश नाईक देसाई यांनी लक्ष पुरविले आहे. तळीच्या ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करण्याबरोबर भव्य मंडप उभारण्यात आला आहे.