वेलिंग्टन कसोटी रोमहर्षक वळणावर
न्यूझीलंडला विजयासाठी 258 तर ऑस्ट्रेलियाला 7 बळींची गरज
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रोमहर्षक वळणावर पोहोचला आहे. या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 3 बाद 111 धावा केल्या आहेत. त्यांना सामना जिंकण्यासाठी आणखी 258 धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी 7 विकेट्सची गरज आहे. तत्पूर्वी, ग्लेन फिलिप्सच्या भेदक माऱ्यासमोर कांगारुंचा दुसरा डाव 164 धावांवर आटोपला व यजमान न्यूझीलंडला विजयासाठी 369 धावांचे टार्गेट मिळाले.
प्रारंभी, ऑस्ट्रेलियन संघाने 2 बाद 13 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण न्यूझीलंडचा कामचलाऊ ऑफस्पिनर ग्लेन फिलिप्सने 45 धावांत 5 बळी घेत कांगारुंचा चांगलाच दणका दिला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 51.1 षटकांत अवघ्या 164 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 204 धावांची आघाडी मिळाली होती. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर सामना जिंकण्यासाठी 369 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑसी संघाकडून नॅथन लियॉनने सर्वाधिक 41 धावा केल्या. कॅमरुन ग्रीनने 34 तर ट्रेव्हिस हेडने 29 धावांचे योगदान दिले. इतर ऑसी फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. फिरकीपटू फिलिप्सने उस्मान ख्वाजा (28), कॅमेरॉन ग्रीन (34), ट्रॅव्हिस हेड (29), मिचेल मार्श (0) आणि अॅलेक्स कॅरी (3) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मॅट हेन्रीने 3 तर टीम साऊदीने 2 बळी घेत फिलिप्सला मोलाची साथ दिली.
न्यूझीलंडला विजयासाठी 258 धावांची गरज
विजयासाठीच्या 369 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 3 बाद 111 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड लक्ष्यापेक्षा 258 धावांनी मागे आहे. तिसऱ्या दिवशी रचिन रविंद्र 56 आणि डॅरिल मिचेल 12 धावांवर नाबाद राहिले. चौथ्या दिवशी या दोघांवरच न्यूझीलंडची मदार आहे. किवीज सलामीवीर टॉम लॅथमला 8 धावांवंर नॅथन लियॉनने बाद करत कांगारुंना पहिले यश मिळवून दिले. विल यंग 15 धावा करुन बाद झाला. न्यूझीलंडने अखेरच्या सत्रात केन विल्यम्सनची विकेट गमावली. पहिल्या डावात शुन्यावर धावबाद झालेला विल्यम्सन दुसऱ्या डावात स्लीपमध्ये झेलबाद झाला. त्याने 9 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 383 व दुसरा डाव 51.1 षटकांत सर्वबाद 164 (ख्वाजा 28, नॅथन लियॉन 41, कॅमरुन ग्रीन 34, हेड 29, फिलिप्स 45 धावांत 5 बळी, हेन्री 3 तर साऊथी 2 बळी).
न्यूझीलंड पहिला डाव 179 व दुसरा डाव 41 षटकांत 3 बाद 111 (लॅथम 8, विल्यम्सन 9, रविंद्र खेळत आहे 56, मिचेल खेळत आहे 12, लियॉन 2 बळी).
फिरकीपटू ग्लेन फिलिप्सने मोडला 16 वर्षापूर्वीचा विक्रम
मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या फिलिप्सकडे फिरकी गोलंदाजीचीही क्षमता आहे. तिच कला या सामन्यात न्यूझीलंडला फायदेशीर ठरली. ग्लेन फिलीप्स हा न्यूझीलंडसाठी 16 वर्षांनंतर घरच्या मैदानावर पाच विकेट घेणारा पहिला किवी फिरकी गोलंदाज ठरला आहे. फिलिप्सने 45 धावांत 5 बळी किवीज संघासाठी मोलाची कामगिरी केली. विशेष म्हणजे, त्याने आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच एका डावात 5 विकेट घेण्याचा चमत्कार केला आहे. 2008 नंतर न्यूझीलंडच्या एकाही फिरकीपटूने घरच्या मैदानावर पाच विकेट घेतलेल्या नाहीत. याआधी अशी कामगिरी जीतन पटेलने केली होती. 208 मध्ये त्याने विंडीजविरुद्ध 110 धावांत 5 बळी घेतले होते.
नाईट वॉचमन नॅथन लियॉनचा भन्नाट विक्रम
लायनने वेलिंग्टन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 41 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने कसोटीत 1500 धावांचा टप्पा पूर्ण केला. यामुळे तो एकही अर्धशतक न करता कसोटीत 1500 धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. एकही अर्धशतक न करता सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये लायनच्या पाठोपाठ केमार रोच आहे. त्याने एकही अर्धशतकही न करता 1174 धावा केल्या आहेत.