विहिरीत पडून 13 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये दुर्घटना : मृतांमध्ये 9 मुली; विवाहापूर्वीच्या हळदी समारंभाला गालबोट
कुशीनगर / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे बुधवारी रात्री हृदयद्रावक दुर्घटना घडली. येथे हळदी समारंभादरम्यानच्या विधीवेळी विहिरीचा स्लॅब तुटल्याने पूजेसाठी उपस्थित महिला विहिरीत पडल्या. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नऊ मुली आणि चार महिलांचा समावेश आहे. बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास हा अपघात झाला. घटनेनंतर सुमारे तासाभरात दाखल झालेल्या प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत बचावकार्य केले. या दुर्घटनेत सुमारे 30-35 महिला जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना कुशीनगरमधील नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरात घडली.
कुशीनगर जिह्यात लग्नाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांना विहिरीत पडून आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे. नेबुओ नौरंगिया येथे अनेक महिला आणि तरुणी हळदीसाठी उपस्थित होत्या. यावेळी त्या विहिरीवर लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीवर उभ्या होत्या. अतिरिक्त वजनामुळे जाळी तुटल्यामुळे त्यावर उभ्या असलेल्या सर्व महिला विहिरीत पडल्या. अपघातानंतर 15-20 मिनिटे फक्त आरडाओरडा झाला. सगळे घाबरले होते. बचावकार्यावेळी पोलीस आणि गावकऱयांनी जवळपास 15 महिलांना वाचविले असले तरी 13 जणांना प्राण गमवावे लागले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रशासनाला बचावकार्य तसेच जखमींवरील उपचारासाठी सर्व मदत करण्याचा आदेश दिला आहे.
टोला येथील रहिवासी परमेश्वर कुशवाह यांच्या मुलाच्या हळदी समारंभादरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटना घडली तेव्हा अंधार असल्यामुळे सर्वांचाच गोंधळ उडाला. गावातील माणसे धावत जाऊन पोहोचेपर्यंत बराच विलंब झाला होता. त्यामुळेच अनेक महिलांचा बुडून मृत्यू झाला. अंधारामुळे बचावकार्य वेळेत होऊ शकले नाही. ग्रामस्थांनी आपापल्या स्तरावर मोबाईल व वाहनाचे हेडलाईट लावून बचावाचा प्रयत्न केला. यानंतर पोलीस आणि प्रशासन दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत मदत व बचावकार्य सुरू होते. सर्व जखमींना तातडीने विहिरीतून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तेथे डॉक्टरांनी 13 जणांना मृत घोषित केले. मृतांमध्ये 5 ते 15 वयोगटातील 9 मुलींचा समावेश आहे.
डॉक्टरांचा निष्काळजीपणा, नातेवाईकांचा आरोप अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तासाभराने रुग्णवाहिका दाखल झाली. तातडीने रुग्णवाहिका दाखल न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तसेच जखमींना रुग्णालयात नेल्यानंतर तेथे डॉक्टर उपस्थित नसल्याने नातेवाईक अधिकच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. डॉक्टरांचा निष्काळजीपणा आणि वेळीच न मिळालेल्या उपचारामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.