विरोधी पक्षनेतेपदी अखेर आर. अशोक
भाजप विधिमंडळाच्या बैठकीत निर्णय : विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी नियुक्ती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर येऊन सहा महिने उलटल्यानंतर अखेर भाजपने विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड केली आहे. बेंगळूरमधील पद्मनाभनगरचे आमदार आर. अशोक यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी बी. वाय. विजयेंद्र यांची निवड करण्यात आल्यानंतर आठवडाभरात विरोधी पक्षनेत्याची निवड झाली आहे.
शुक्रवारी नूतन भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली बेंगळूरमधील खासगी हॉटेलमध्ये विधिमंडळ नेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेता निवडीसाठी हायकमांडने निरीक्षक म्हणून केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन आणि दुष्यंत कुमार यांना बेंगळूरला पाठविले होते. हे दोन्ही नेते या बैठकीत सहभागी झाले होते. दीड तासहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत बसवराज बोम्माई यांनी अशोक यांचे विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव सूचविले. त्यावर इतर आमदार व्ही. सुनीलकुमार यांनी अनुमोदन दिले.
विधानसभा निवडणुकीवेळी लिंगायत समुदायातील मताचे विभाजन झाले होते. त्यामुळे या समुदायाला आकर्षित करण्यासाठी विजयेंद्र यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. आता दक्षिण कर्नाटकात बहुसंख्येने असणाऱ्या वक्कलिग समुदायाला आकर्षित करण्यासाठी माजी मंत्री व विद्यमान आमदार आर. अशोक यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्यात आले आहे. या पदासाठी आमदार डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण, व्ही. सुनीलकुमार, बसनगौडा पाटील-यत्नाळ हे इच्छुक होते.
नाराजी उफाळून येणार?
राज्यात विधानसभा निवडणूक होऊन 6 महिने उलटल्यानंतर भाजप हायकमांडने कर्नाटकात पक्ष प्रदेशाध्यक्षपदी युवा लिंगायत नेते आणि माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची नेमणूक केली आहे. परंतु, वरिष्ठांच्या या निर्णयावर अनेक नेते नाराज आहेत. माजी मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ, बी. श्रीरामुलू आणि व्ही. सोमण्णा यांनी विजयेंद्र यांच्या नेमणुकीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्यासह आणखी काही नेत्यांना विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली नेमणूक पचनी पडलेली नाही. यत्नाळ यांनी उत्तर कर्नाटकाला विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, दोन्ही पदे दक्षिण कर्नाटकाला देण्यात आल्याने आल्याने राज्य भाजपमधील नाराजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बेळगाव अधिवेशनात आर. अशोक सरकारविरुद्ध आवाज उठवतील
बेंगळूरमध्ये विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडले होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर परखड टीका केली होती. भाजपजवळ विरोधी पक्षनेतेपद भूषविण्याची क्षमता असणारा नेता नाही, अशा शब्दात भाजपवर टिप्पणी करण्यात आली होती. दरम्यान, पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हायकमांडने देखील हे पद नेमण्याकडे लक्ष दिले नव्हते. बेळगावमध्ये 4 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार असल्याने हायकमांडने विरोधी नेता निवडीसाठी तातडीने पावले उचलली. आता बेळगावमधील अधिवेशनात काँग्रेस सरकारविरोधात आर. अशोक विधानसभेत आवाज उठवतील.
बैठकीवर यत्नाळ यांचा बहिष्कार?
भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होण्याआधी बसनगौडा पाटील-यत्नाळ आयटीसी गार्डेनिया हॉटेलमध्ये पोहोचले. मात्र, विरोधी पक्षनेतेपदासाठी आर. अशोक यांचे नाव पुढे आल्याचे समजताच ते बैठक सुरू होण्याआधी तेथून बाहेर पडले. आमदार अरविंद बेल्लद आणि रमेश जारकीहोळी यांनीही बैठकीवर बहिष्कार घातल्याचे समजते.
वयाच्या दहाव्या वर्षी रा. स्व. संघात प्रवेश
1975-77 दरम्यान आणीबाणीवेळी कारावास
1995 मध्ये बेंगळूर शहर भाजप अध्यक्ष
1997 उत्तरहळ्ळी येथून पहिल्यांदा विधानसभेवर
1999 व 1994 मध्येही आमदार
2008, 2013, 2018 व 2023 मध्ये पद्मनाभनगरमधून सलग विजय
2006-07 मध्ये भाजप-निजद युती सरकारमध्ये आरोग्य-कुटुंब कल्याणमंत्री
2008-10 मध्ये येडियुराप्पा सरकारमध्ये परिवहन, अन्न-नागरी पुरवठा मंत्री
2010-13 दरम्यान परिवहन, गृहमंत्री, जगदीश शेट्टर मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्रिपद
2019-2023 या कालावधीत महसूल खात्याची धुरा
पराभवाची भीती नाही!
काँग्रेस सरकार बेफिकीर असून त्यांचे अपयश जनतेसमोर आणण्यात येईल. आतापासूनच आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली जाईल. आम्हाला पुढील निवडणुकीत पराभवाची भीती नाही. हायकमांड तसेच राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन.
- आर. अशोक, विधानसभा विरोधी पक्षनेते