For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विरोधकांसाठी रात्र थोडी, सोंगे फार

06:06 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
विरोधकांसाठी रात्र थोडी  सोंगे फार
Advertisement

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने येती लोकसभा निवडणूक ही 1977 पेक्षा जास्त महत्वाची आहे असे दावे वरचेवर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दोन हात करायला विरोधी पक्ष आजमितीला कितपत तयार आहेत? या प्रश्नाचे उत्तर निदान या घडीला फारसे आशावादी नाही. ‘विरोधी पक्ष ठीक रीतीने कामाला लागलेले नाहीत’, अशी ओरड सगळीकडे ऐकू येत असल्याने ‘कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे’ अशा तोऱ्यात राज्यकर्ते आहेत. आता निवडणुकीला केवळ तीन महिने आहेत. विरोधकांसाठी ‘रात्र थोडी, सोंगे फार’ असे झाले आहे. काय काय करायचे आहे याची जंत्री लांब आहे. एकूण लोकांच्या मनात त्यांना नवीन विश्वास निर्माण करायचा आहे. तो निर्माण झाला तर अर्धी लढाई जिंकली असे होणार आहे.

Advertisement

अशावेळी अयोध्येच्या भव्य मंदिराचे उदघाटन 22 तारखेला साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याने देशभर हिंदुत्वाचा ज्वर पसरवून एप्रिल-मे मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत लीलया हॅटट्रिक मारण्याचा भाजपचा डाव सगळ्यांना स्पष्ट दिसत आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखला जाणारा राम निवडणुकीत आपले चांगभले करण्यासाठी वापरण्याचा डाव जुना आहे. त्यामुळे सत्ताधारी ‘अब की बार, 400 पार’ ची भाषा करत आहेत. फेब्रुवारीमध्ये अबूधाबीत स्वामी नारायण मंदिराचे उदघाटन मोदींच्याच हातून असल्याने हिंदुत्वाच्या ज्वराचा बुस्टर डोस तेव्हाही दिला जाणार आहे. हिंदुत्वाचा झेंडा मोदींनी अटकेपार नेला असे सांगितले गेले तर नवल ठरणार नाही. थोडक्यात काय तर फड मारण्यासाठी सत्ताधारी मल्ल अंगाला तेल लावून तयार असताना विरोधकांत मात्र पुरती सावधानी आलेली नाही.

मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे एकदम पटात शिरले आणि तिसऱ्यांदा सत्तेत आले तर सर्व विरोधकांवर वरवंटा चालेल अशी भावना गैर-भाजप वर्तुळात आहे. पण  तरी त्याचा मुकाबला करण्याकरिता जेव्हढी एकजूट दाखवायला पाहिजे तेव्हढी आजतरी दिसत नाही. 31 डिसेंबरपर्यंत जागावाटप करण्याचे ठरले होते. ते काम रेंगाळले आहे आणि अजून पंधरवडा तरी चालेल असे वाटत आहे. हे जाणूनबुजून वेळकाढूपणा चालवणे आहे की एखाद्या रणनीतीनुसार हे कळायला मार्ग नाही. दुधाने तोंड पोळले म्हणून ताकदेखील फुंकून पिण्याचा प्रकार विरोधी पक्षांनी चालवला आहे असेही सांगितले जाते. इंडिया आघाडीत वज्रमुठी ऐक्याचे चित्र निर्माण झाले तर सरकारच्या ईडी सारख्या एजन्सीज परत धाडीसत्र सुरु करून विरोधी पक्षांच्या नाकाला दम आणतील अशी भीती आहे. विरोधकांपुढे अडचणी असंख्य.  मोदी-शहा हे फार तयारीचे गडी असल्याने आत्ताच दोन हात करायला विरोधी पक्ष तयार आहेत असे चित्र दिसले तर ते नवीन विघ्ने उत्पन्न करणार, नवीन संकटे आणणार म्हणून ते सध्या दिवाभीताप्रमाणे वागत आहेत. त्यातूनच सरकारधार्जिणी प्रसारमाध्यमे ही विरोधकातील मतभेदांचेच रात्रंदिवस चर्वितचर्वण करत असल्याने सगळीकडे भाजपची बल्ले बल्ले दाखवली जात आहे. रालोआमध्ये काही मतभेदच नाहीत असे दावे होत असले तरी मोदी-शहा यांना घाबरून मित्रपक्ष ते चव्हाट्यावर आणत नाहीत इतकेच.

Advertisement

गेल्या आठवड्यात ज्याप्रकारे देशभर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा संप अचानक पेटला. त्यातून राज्यकारभार फारसा चांगला चाललेला नाही आणि संवादाच्या अभावाने हे सरकार आपल्याच पायावर धोंडा पाडून घेते असे चित्र निर्माण झाले आहे. ते फारसे ठीक नाही. अशातच ध्रुवीकरण करण्यासाठी वादग्रस्त सीएए कायदा लागू करण्याची सरकारने घोषणा केली आहे. जहाल हिंदुत्ववादी हे काशी आणि मथुरामध्ये बाबा विश्वनाथ आणि कृष्णजन्मस्थान मंदिरांचे पुनर्निर्माण करून शेजारील मशिदी हटवाव्यात अशी मागणी करत आहेत. विरोधकांकडे मुद्दे नाहीत असे नाही पण ते निवडणूक जाहीर होण्याची वाट बघत आहेत असे दिसत आहे.

विरोधकांत पांगापांग करण्याचे सारे डाव खेळले जात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडी कोणत्याही क्षणी अटक करेल असे चित्र आहे. एकेकाळी भाजपचे बगलबच्चे समजले जाणारे केजरीवाल यांना त्यामुळे मोदी-शहा यांच्याविरुद्ध उभे राहून काँग्रेसची साथ घेणे भाग पडत आहे. राजधानी दिल्लीतील सात मतदारसंघात त्यामुळे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यात अनुक्रमे 4 आणि तीन असे वाटप होऊ शकते. केजरीवाल ‘आत’ गेले तर भाजपवर संक्रांत येईल अशी भीती स्थानिक नेते व्यक्त करत आहेत पण त्यांना कोणी ऐकणारे नाही. ‘आप’च्या या नव्या भूमिकेने गुजरातमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना होऊ शकतो. बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पूर्ण भांडवल करून ममता बॅनर्जीना धमकावणे सुरु झाले आहे. केवळ जयप्रकाश नारायण अथवा विश्वनाथ प्रताप सिंग यांचा विरोधकांकडे अभाव नाही. त्यांच्याकडे ‘बिग पिक्चर’ बघणारा कोणी नाही अशी टीका होत आहे. असे असतानाच काँग्रेसने आपण 543 पैकी केवळ 255 जागा लढवणार असे संकेत देऊन सगळ्यांनाच चकित केलेले आहे. याचा अर्थ असा की देशातील निम्म्यापेक्षा जास्त जागा प्रादेशिक आणि छोट्या पक्षांना सोडून द्यायचा निर्णय करून काँग्रेसने एकप्रकारे षटकारच मारला आहे. गेल्या निवडणुकीत 421 जागा लढवलेल्या काँग्रेसने बदललेली ही रणनीती इंडिया आघाडीतील गैरकाँग्रेसी पक्षात विश्वास निर्माण करेल. ‘तुम्ही जर जास्त जागा जिंकलात तर तुमच्यापैकी कोणीही पंतप्रधान बनू शकतो’, असा संदेश दिल्याने प्रादेशिक पक्ष देखील कडवी झुंज देतील अशी अपेक्षा केली जात आहे

ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांच्यात कलगीतुरा सुरु आहे. बंगालमध्ये 42 पैकी केवळ दोन जागा स्वीकारायला काँग्रेस काही भिकारी नव्हे असे अधीरबाबू म्हणाले आहेत. ममतांचे समर्थक इंडिया आघाडी ही निवडणुकीनंतरची आहे असा दावा करत काँग्रेसने बंगालमध्ये स्वबळावर लढावे. असे केल्याने राज्यात भाजपची स्पेस कमी होईल असे म्हणत आहेत. पंजाबमधील काँगेसी आप बरोबर निवडणूक समझोता करण्याच्या विरोधात आहेत. तिथे देखील दोन्ही पक्ष वेगळे लढून भाजपला अडचणीत आणू शकतात. अजूनही विविध राज्यातील काही छोटेखानी पक्ष इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी उत्सुक आहेत हे चित्र उत्साहजनक आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, आसाम, उत्तराखंड, कर्नाटक, गोवा अशा 8-10 राज्यात भाजप आणि काँग्रेस यांचा सरळ मुकाबला आहे. तिथे जागावाटपाचा प्रश्न उद्भवणार नाही. केरळमध्ये काँग्रेस आणि डावे पक्ष दशकानुदशके एकमेकासमोर उभे ठाकल्याने जागावाटपाचा प्रश्नच नाही. बिहारमध्ये काँग्रेस हा फुटकळ प्लेअर असल्याने तिथे जागावाटप अवघड नाही. 130 जागा असलेल्या दक्षिणेकडील राज्यात भाजप कमकुवत झालेली आहे, होत आहे. तिथे गेल्यावेळी जवळजवळ 30 जागा जिंकलेला भाजप यावेळी त्याच्या निम्म्यातरी जिंकेल काय याबाबत शंका आहे. पुढील दहा दिवसात सुरु होणारी भारत जोडो न्याय यात्रा कशा प्रकारचा उत्साह निर्माण करेल आणि कशा प्रकारे विरोधी पक्षांना एकत्र आणेल त्यावर बरेच काही ठरणार आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.