विनामास्क फिरणाऱयांकडून साडेतीन हजारांचा दंड वसूल
वार्ताहर / राजापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन आणि प्रशासन शिवाय विविध सामाजिक संस्था ओरडून सांगत असतानाही मास्कचा वापर न करणाऱयांवर राजापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाई करून साडेतीन हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.
लॉकडाऊनच्या विविध टप्प्यातही कडक निर्बंध असताना राजापूरच्या बाजारपेठेत सोशल डिस्टंसिगंचा पुरता बोजवारा उडत होता. आता लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथिल झाल्याने राजापूर शहर बाजारपेठेत दररोज मोठी गर्दी होताना दिसत आहे. निर्बंध शिथिल झाले असले तरी शासनाने मास्कचा वापर अनिवार्य केलेला आहे. त्यामुळे शहरात मास्क न वापरता फिरणाऱयांवर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
यापूर्वी मास्क न वापरल्याप्रकरणी दोनवेळा दंडात्मक कारवाई करताना जवळपास साडेनऊ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. त्यानंतर त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाईची मोहीम हाती घेताना मास्क न वापरणाऱयांकडून एका दिवसात तब्बल साडेतीन हजार रूपयांचा दंड गोळा केला आहे. त्यामुळे शहरात मास्क न लावता फिरणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान राजापूर नगर परिषदेद्वारे मास्क न वापरणाऱयांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येते. मात्र त्यामध्ये सातत्य नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई होते. मात्र बाजारपेठेतील काही व्यापारी मास्क न लावता दुकानात बसलेले असतात, त्यांच्यावर मात्र कारवाई होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.