विजय सरदेसाई यांचे आरोप म्हणजे निरर्थक बडबड
मंत्री माविन गुदिन्हो यांची टीका सरकारची कामगिरी शिघ्रगतीने
प्रतिनिधी/ पणजी
नीती आयोगाच्या आकडेवारीत विरोधाभास निर्माण करून गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकार गोव्यातील जनतेसाठी कशाप्रकारे काम करीत आहे हे पूर्ण गोमंतकीयांना माहीत आहे म्हणूनच तर प्रत्येक निवडणुकीत भाजपला यश मिळत आहे. विजय सरदेसाई यांनी सरकारवर केलेली टीका ही केवळ त्यांची बडबड आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. तसेच सरदेसाई यांचे आरोप फेटाळून लावले.
काल शनिवारी भाजपच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री गुदिन्हो बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत वास्कोचे आमदार दाजी साळकर, प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांना जी आकडेवारी मिळते त्याच्या आधारेच ते जनतेला माहिती देत असतात. राज्यातील बेरोजगारीबाबत जी माहिती नीती आयोगाने दिली आहे ती खरी असली तरी राज्यात प्रत्यक्षात बेरोजगारीची आकडेवारी कमीप्रमाणात असून हे जनतेलाही माहीत आहे. गोव्यात चांगल्याप्रकारे सरकार चालत असून जनतेच्या हितासाठी दिवस-रात्र काम करीत आहे हे विजय सरदेसाई यांना पाहावत नाही त्यामुळे ते सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही मंत्री गुदिन्हो यांनी केला.
सरदेसाई यांची स्थिती ‘ना तळय़ात-ना मळय़ात’
विरोधकांनी विरोध करावा मात्र तो विरोध सकारात्मक असावा जेणेकरून सत्ताधारी पक्षाकडून काही चूक होत असल्यास ती सुधारण्याची संधी मिळते. मात्र केवळ स्वतःच्या हेतूसाठी सरकारला बदनाम करणे म्हणजे विरोध नव्हे तर तो मूर्खपणा आहे. आमदार विजय सरदेसाई सध्या एकाकी पडलेले आहेत, काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये आले आणि विजय सरदेसाई यांना ती संधी मिळाली नाही त्यामुळे ते सैरभैर झालेले आहेत. गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपात विलीन करण्याची तयारी विजय सरदेसाई यांनी दर्शविली होती, मात्र भाजपच्या हायकमांडने त्यांना नकार दिला असल्याने त्यांची स्थिती ‘ना तळ्यात ना मळ्यात’ अशीच झाली असून सरकारविराधात काय वाटेल ते बरळत आहेत. गोमंतकीय जनता सुजाण असून त्यांच्या या वक्तव्याला बळी पडणार नाही उलट त्यांचा मूर्खपणा जनतेला दिसेल, असेही गुदिन्हो म्हणाले.
भाजप सरकार काळात सर्वांगीण विकास
भाजप सरकारच्या कार्यकाळात गोव्याचा मोठय़ा प्रमाणात सर्वांगीण विकास झाला आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. सरकारला अनेक पुरस्काराच्या स्वरूपात पावती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गोव्यावर शुभाशीर्वाद असून गोव्याला भरमसाट निधी पुरविला जात आहे. झुवारी पूल, मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ यासारखे अनेक मोठे प्रकल्प गोव्यात आले आहेत. बेकारी नष्ट करण्यासाठीही सरकार विविध योजना राबवित आहे. आयआयटीसारखे प्रकल्प गोव्यात आणण्याचा प्रयत्न आहे, मात्र लोक त्याला विरोध करीत आहेत. गोव्यात जे मोठे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला जात आहे तो केवळ येथील लोकांना रोजगार मिळावा म्हणून हे लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे, असेही मंत्री गुदिन्हो म्हणाले.
‘कोल्हय़ाला द्राक्षे आंबट’
आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप एका वाक्यात सांगायचा झाल्यास ‘कोल्हय़ाला द्राक्षे आंबट’ असाच प्रकार आहे, असे गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले. विजय सरदेसाई यांची मक्तेदारी केवळ फातोर्डापुरतीच आहे. त्यामुळे त्यांनी गोवा फॉरवर्ड पार्टी हे नाव बदलून फातोर्डा फॉरवर्ड पार्टी ठेवावे, असेही गिरीराज म्हणाले. आता तर ते मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावरही सोनसडावरून आरोप करायला लागले आहेत. वास्तविक मडगाव पालिकेची निवडणूक दोघांनीही एकत्रित लढवली तेव्हा दोघेही एकमेकांच्या गळय़ात गळा घालून होते. तेव्हा विजय सरदेसाई यांना सोनसडा आठवला नाही, का असा सवाल गिरीराज यांनी उपस्थित केला. सरदेसाई हे सत्तेसाठी हपापलेले असून त्यांना ती मिळणे शक्य नसल्याने ते वैफल्यग्रस्त बनले आहेत, असेही गिरीराज म्हणाले.
वास्को बसस्थानकांची सुधारणा होणार
यावेळी आमदार दाजी साळकर म्हणाले की, केंद्र सरकारच्या आधाराने गोव्यात चांगली विकासकामे होत आहेत. वास्को मतदारसंघातील सर्व बसस्थानकांची सुधारणा करून नव्याने बांधण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. त्याचे सोपस्कार पूर्ण करीत आहोत. सरकार करीत असलेली विकासकामे सरदेसाई यांना पाहवत नाही म्हणून ते खो घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.