For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीज-बांगलादेश यांच्यात आज अस्तित्वाचा लढा

06:15 AM Oct 29, 2021 IST | Tarun Bharat Portal
विंडीज बांगलादेश यांच्यात आज अस्तित्वाचा लढा
Advertisement

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा : लागोपाठ पराभवांमुळे दोन्ही संघांसाठी ‘करा वा मरा’ धर्तीवरील लढत, सर्वस्व पणाला लावून लढण्याची गरज

Advertisement

वृत्तसंस्था /शारजाह

सुपर-12 फेरीत लागोपाठ पराभव पत्करणारे विद्यमान विजेते विंडीज आणि बांगलादेशचे संघ आज (शुक्रवार दि. 29) निर्णायक लढतीत आमनेसामने भिडणार असून अस्तित्वाचे आव्हान असल्याने दोन्ही संघांना सर्वस्व पणाला लावून लढावे लागेल, हे निश्चित आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाईल.

Advertisement

यापूर्वी, विंडीजला आपल्या पहिल्या दोन लढतीत इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला तर बांगलादेशला इंग्लंड व श्रीलंकेने धूळ चारली. उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाअपेक्षा कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना या लढतीत विजय मिळवणे क्रमप्राप्त असणार आहे.

विंडीजसमोर दोन्ही आघाडय़ांवर चिंता

विंडीजला येथे प्रामुख्याने फलंदाजीतील बरेच पेच सोडवावे लागतील. या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध सलामी लढतीत त्यांचा डाव अवघ्या 55 धावांमध्येच खुर्दा झाला, याची सल त्यांना आताही जाणवत असणार आहे. त्या लढतीत त्यांचे बहुतांशी फलंदाज बेजबाबदार फटके मारत तंबूत परतले. स्ट्राईक रोटेट करत डाव सावरण्याऐवजी उत्तुंग, अति आक्रमक फटके मारण्याचे त्यांचे प्रयत्न संघाला पराभवाच्या खाईत लोटणारे ठरले.

त्यानंतर दुसऱया लढतीत लेंडल सिमन्सने 16 चेंडूत 35 धावांची आतषबाजी केली. इव्हिन लुईसनेही धडाकेबाज फलंदाजी साकारली. पण, 11 ते 20 षटकादरम्यान त्यांनी 64 धावांमध्येच 8 फलंदाज गमावले आणि पुन्हा एकदा त्यांना अपयशाचा सामना करावा लागला.

विंडीजचे गोलंदाज देखील यादरम्यान अगदीच खराब प्रदर्शन करत आले आहेत. केवळ डावखुरा फिरकीपटू अकिल होसेन याला अपवाद ठरला. युएईमधील वातावरण विंडीजच्या ‘बिग हिटिंग स्टाईल’ला साजेसे नाही, याचाही त्यांना फटका बसत आला आहे.

बांगलादेशला खेळपट्टय़ांची उत्तम जाण

दुसरीकडे, प्रतिस्पर्धी बांगलादेशला युएईमधील संथ खेळपट्टय़ांवर स्वतःला जुळवून घेण्याची कला अवगत असली तरी येथील सुपर-12 फेरीतील पहिल्या दोन सामन्यात ते कमालीचे अपयशी ठरले आहेत. सहावा मानांकित संघ म्हणून या स्पर्धेत उतरलेल्या बांगलादेशने न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गजांना देखील पराभवाचे धक्के दिले. पण, याची पुनरावृत्ती त्यांना सुपर-12 फेरीत करता आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मोहम्मद नईम, लिटॉन दास, शकीब हसन, महमुदुल्लाह व मुश्फिकूर रहीमसारखे गुणवान खेळाडू या संघात आहेत. पण, आवश्यकतेनुरुप खेळ साकारण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यांच्या गोलंदाजीमध्येही शिस्तीचा अभाव राहिला असून विंडीजच्या फलंदाजांना याचा लाभ घेता येणार का, हे आजच्या लढतीत स्पष्ट होईल. बांगलादेशने येथील मैदानावर रविवारी मागील लढत खेळली असल्याने ही त्यांची जमेची बाजू असू शकते.

दुखापतग्रस्त मकॉयऐवजी अनुभवी होल्डरचा समावेश

मध्यमगती गोलंदाज ओबेद मकॉय दुखापतग्रस्त असल्याने विंडीजने आयसीसी टी-20 विश्वचषक संघात त्याच्याऐवजी अष्टपैलू जेसॉन होल्डरचा समावेश केला. स्पर्धा तांत्रिक समितीने या बदलाला मंजुरी दिली. पहिल्या दोन्ही लढती गमावणारा विंडीजचा संघ येथे आज बांगलादेशविरुद्ध भिडणार आहे.

होल्डरने 27 टी-20 सामन्यांसह एकूण 199 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. स्पर्धा सुरु असताना दुखापतीमुळे पर्यायी खेळाडूची निवड करणे भाग असेल तर अशा निवडीला तांत्रिक समितीची परवानगी आवश्यक असते. विद्यमान तांत्रिक समितीत ख्रिस टेटले, क्लाईव्ह हिथकॉक, राहुल द्रविड, धीरज मल्होत्रा, सायमन डॉल व इयान बिशप यांचा समावेश आहे.

प्रतिस्पर्धी संघ

वेस्ट इंडीज : केरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, फॅबियन ऍलन, डेव्हॉन ब्रेव्हो, रॉस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरॉन हेतमेयर, इव्हिन लुईस, जेसॉन होल्डर, लेंडल सिमन्स, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, ओशेन थॉमस, हेडन वॉल्श ज्युनियर.

बांगलादेश : महमुदुल्लाह (कर्णधार), लिटॉन दास, मोहम्मद नईम, मेहदी हसन, शकीब हसन, सौम्या सरकार, मुश्फिकूर रहीम, नुरुल हसन, अफिफ होसेन, नसूम अहमद, तस्किन अहमद, शमिम होसेन, मुस्तफिजूर रहमान, मोहम्मद सैफुद्दिन, शोरिफुल इस्लाम.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 पासून.

Advertisement
Tags :

.