For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनडे मालिकेत इंग्लंडची विजयी आघाडी

07:16 AM Mar 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
वनडे मालिकेत इंग्लंडची विजयी आघाडी
Advertisement

दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 132 धावांनी पराभव, जेसन रॉय सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ मीरपूर

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडने यजमान बांगलादेशवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशचा 132 धावांनी दणदणीत पराभव केला. या मालिकेतील आता शेवटचा सामना चेतोग्राम येथे येत्या सोमवारी खेळवला जाईल. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज आणि शतकवीर जेसन रॉयला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 326 धावा जमवल्या. त्यानंतर इंग्लंडच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव 44.4 षटकात 194 धावात आटोपला. इंग्लंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. तस्कीन अहमदने सॉल्टला सातव्या षटकात झेलबाद केले. त्याने 7 धावा जमवल्या. सलामीच्या जेसन रॉयने आक्रमक फलंदाजी करत धावांची गती वाढवली. रॉयने मलानसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 58 धावांची भर घातली. मेहदी हसन मिराजने मलानला पायचित केले. त्याने 11 धावा जमवल्या. ताजूल इस्लामने व्हिन्सेला रहीमकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 5 धावा केल्या. रॉय आणि कर्णधार बटलर या जोडीने चौथ्या गड्यासाठी 109 धावांची भागीदारी केली. शकीब अल हसनच्या गोलंदाजीसमोर रॉय चौथ्या गड्याच्या रुपात पायचित झाला. रॉयने 124 चेंडूत 1 षटकार आणि 18 चौकारासह 132 धावा झळकवल्या. रॉयचे वनडे क्रिकेटमधील हे बारावे शतक आहे. रॉयने आपले शतक 104 चेंडूत झळकवले. तसीन अहमदने जॅक्सला एका धावेवर बाद केले. बटलर आणि मोईन अली यांनी सहाव्या गड्यासाठी 52 धावांची भर घातली. मेहदी हसन मिराजने स्वत:च्याच गोलंदाजीवर बटलरला टिपले. त्याने 64 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 76 धावा जमवल्या. मोईन अलीने 35 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 42 धावा केल्या. सॅम करनने शेवटच्या काही षटकात तुफान फटकेबाजी करताना केवळ 19 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 33 धावा झोडपल्याने इंग्लंडला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला. इंग्लंडच्या डावात 8 षटकात आणि 30 चौकार नेंदवले गेले. बांगलादेशतर्फे तस्कीन अहमदने 3, मेहदी हसन मिराजने 2, शकीब अल हसन व ताजुल इस्लामने यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना सॅम करन आणि आदिल रशीद यांच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव 44.4 षटकात 194 धावात आटोपला. बांगलादेशच्या डावात अनुभवी शकीब अल हसनने 69 चेंडूत 5 चौकारासह 58, कर्णधार तमीम इक्बालने 65 चेंडूत 4 चौकारासह 35, मेहमुदुल्लाने 49 चेंडूत 3 चौकारासह 32, अफीफ हुसनने 1 षटकार आणि 2 चौकारासह 23, तस्कीन अहमदने 4 चौकारासह 21 धावा जमवल्या. बांगलादेशच्या डावात 1 षटकार आणि 18 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे सॅम करनने 29 धावात 4 तर आदिल रशीदने 45 धावात 4 तसेच मोईन अलीने 27 धावात एक गडी बाद केला. 2016 पासून बांगलादेश संघाने आपल्या घरच्या भूमीवर द्विपक्षीय वनडे मालिका गमवली नव्हती. त्यांनी या कालावधीत सलग सात वनडे मालिका जिंकल्या होत्या. 2016 साली बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ बांगलादेशमध्ये पहिली वनडे मालिका जिंकत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशचा तीन गड्यांनी पराभव केला होता.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 50 षटकात 7 बाद 326 (रॉय 132, बटलर 76, डेव्हिड मलान 11, मोईन अली 42, सॅम करन नाबाद 33, तस्कीन अहमद 3-66, मेहदी हसन मिराज 2-73, शकीब अल हसन 1-64, ताजुल इस्लाम 1-58), बांगलादेश 44.4 षटकात सर्वबाद 194 (शकीब अल हसन 58, तमीम इक्बाल 35, मेहमुदुल्ला 32, अफीफ हुसेन 23, तस्कीन अहमद 21, सॅम करन 4-29, आदिल रशीद 4-45, मोईन अली 1-27).

Advertisement
Tags :

.