लोवले शाळेच्या वादग्रस्त नामफलकावर पडदा
वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील लोवले जि. प. मराठी शाळेच्या प्रवेशद्वाराला खासगी व्यक्तीचे नाव लावल्याने गेली काही दिवस हे प्रकरण चांगलेच तापले असताना तो फलक तात्काळ हटवण्याचे आदेश खुद्द जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शिक्षण विभागाला दिल्याने बुधवारी सांयकाळी वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत त्या प्रवेशद्वारावर कापड टाकून झाकण्यात आले.
जि. प.मराठी शाळा लोवले या शाळेच्या प्रवेश द्वाराला माजी सरपंच चंद्रकांत चव्हाण यांनी आपल्या वडिलांचे नाव दिले होते याप्रकरणी गावातील ग्रामस्थानी शिक्षण विभागाकडे वेळो वेळी तक्रार करुनही नाव काढण्यास शिक्षण विभाग टाळाटाळ करत होता. या प्रकरणी ग्रामस्थानी जिल्हाधिकारी यांच्याकडे कैफीयत मांडली असता जिल्हाधिकारी यांनी दुरध्वनी वरुन हे नाव तात्काळ हटवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांना दिले.
यानंतर काल सांयकाळी या नावावर पडदा चिकटवण्यात आला असुन आचार संहीता संपताच हे नाव तत्काळ हटवण्यात यावे असे आदेश दिले आहेत. शिक्षण विभागाला आदेश प्राप्त होताच बुधवार सांयकाळी संगमेश्वर पं. समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शाळेच्या प्रवेश द्वारावर पडदा टाकुन ते वादग्रस्त नाव झाकले. त्या नावावर पडदा पडल्याचे समजताच लोवले ग्रामस्थात समाधान पसरले आहे.