लुधियानात सर्वात मोठा सौरवृक्ष
पंजाबमधील लुधियाना शहरात भारतातील सर्वात मोठा सौरवृक्ष उभा करण्यात आला आहे. या सौरवृक्षाची पाने म्हणजे छोटे सौरघट आहेत. हे पानरुपी सौरघट सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि त्यापासून वीज निर्मिती करतात. दिवसाला 200 युनिट वीज निर्माण करण्याची या वृक्षाची क्षमता आहे. गृहसंस्था, व्यापारी संकुले, छोटी शेते इत्यादी ठिकाणी हा सौरवृक्ष विजेची आवश्यकता भागवू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. साधारणतः 310 चौरस मीटर जागेत हा वृक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचे डिझाईन एखाद्या झाडाप्रमाणे असल्याने त्याला सौरवृक्ष असे संबोधण्यात येत आहे.
सीएसआयआर, सीएमईआरआय दुर्गापूरचे संचालक प्रा. हरीष हिराणी यांच्या नेतृत्त्वात काही तंत्रज्ञांनी या वृक्षाची निर्मिती केली आहे. 21 जानेवारी 2022 या दिवशी या वृक्षाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. या वृक्षाची निर्मिती करण्यासाठी नऊ महिन्याचा कालावधी लागला. याची क्षमता 53.7 किलो व्हॅट इतकी आहे. दररोज 200 युनिट वीज यातून मिळू शकते. वर्षाकाठी 60 ते 70 हजार युनिट म्हणजेच प्रतिवर्ष साडेतीन लाख रुपयांची वीज तो निर्माण करू शकतो. त्याचे आयुष्य 25 वर्षाचे आहे. त्याची निर्मिती करण्यासाठी 40 लाख रुपये खर्च झाले आहेत. सध्या खर्चाच्या तुलनेत त्याच्यापासून मिळणारी वीज कमी किमतीची असली तरी भविष्य काळात त्याच्या निर्मितीचा खर्च निम्म्यापेक्षा कमी होऊ शकतो. तसेच एकदा खर्च केल्यानंतर पुन्हा त्यावर खर्च करावा लागत नसल्याने भविष्य काळात हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते, असा दावा करण्यात आला.