लिओन मर्चंड पदकांचा सम्राट !
ऑलिम्पिकमध्ये 4 गोल्डसह एका कांस्यपदकाची कमाई : वैयक्तिक प्रकारात सर्वाधिक पदके मिळवणारा पहिला खेळाडू
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप झाला आहे. या स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताने ऑलिम्पिक 2024 मध्ये केवळ 6 पदकं जिंकली. यातील 1 रौप्य तर 5 कांस्यपदकांचा समावेश आहे. वास्तविक, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून 117 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. पण यातील एकही खेळाडू सुवर्णपदक जिंकू शकला नाही. परंतू इतर देशांतील काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी एकापेक्षा जास्त वैयक्तिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. फ्रान्सचा युवा जलतरणपटू लिओन मर्चंड हा या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकण्यात यशस्वी ठरला. मर्चंडने वैयक्तिक जलतरण स्पर्धेत एकूण 4 सुवर्णपदके जिंकली.
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये फ्रेंच जलतरणपटू लिओन मर्चंडने 4 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत. यंदाच्या स्पर्धेत तो 400 मी वैयक्तिक शर्यत, 200 मी ब्रेस्टस्ट्रोक व बटरफ्लाय, 200 मी वैयक्तिक शर्यत, पुरुषांची 4x100 मी शर्यतीत तो सहभागी झाला होता. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मर्चंडने अवघ्या 2 तासांच्या कालावधीत 2 सुवर्णपदके जिंकली. याशिवाय दुसऱ्या क्रमांकावर अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी वैयक्तिक स्पर्धांमध्ये 3-3 सुवर्णपदके जिंकली आहेत. यामध्ये यूएसएची टोरी हस्इ, सिमोन बायल्स आणि गॅबी थॉमस, ऑस्ट्रेलियाची मॉली ओ‘कॅलाघन यांचा समावेश आहे.
एकाच ऑलिम्पिकमध्ये रशियन अॅलेक्झांडर व अमेरिकन फेल्प्सचे वर्चस्व
एका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम दोन खेळाडूंच्या नावावर आहे. रशियन जिम्नॅस्ट अलेक्झांडर डेटियाटिन अव्वलस्थानी आहे. त्याने 1980 च्या ऑलिम्पिकमध्ये 8 पदके जिंकली होती. ज्यात 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश होता. यानंतर मायकेल फेल्प्सने हा पराक्रम दोनदा केला ज्यामध्ये त्याने 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 कांस्य पदके जिंकली, तर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदके जिंकली होती. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रान्सच्या लिओनने पाच पदके जिंकत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात सर्वाधिक पदके जिंकणारे खेळाडू
- लिओन मर्चंड, फ्रान्स - जलतरणात 4 सुवर्ण व 1 कांस्य
- मॉली ओ‘कॅलाघन, ऑस्ट्रेलिया - जलतरणात 3 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्य
- टोरी हस्क, अमेरिका - जलतरणात 3 सुवर्ण व 2 रौप्य
- सिमोन बायल्स, अमेरिका - जिम्नस्टिकमध्ये 3 सुवर्ण व 1 रौप्य.