लाकडी ट्रेडमिलची निर्मिती
स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी सजग असणारे लोक ट्रेडमिल खरेदी करण्याचा विचार करत असतात. अशा लोकांकरता तेलंगणातील एका व्यक्तीने ट्रेडमिलचा पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध केला आहे. या व्यक्तीच्या लाकडी ट्रेडमिलचे डिझाइन आणि त्याच्या निर्मितीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर इंटरनेटवर सर्व जण त्याचे कौतुक करत आहेत. त्याच्या अभिनव प्रयत्नाने राज्याचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामाराव यांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
या व्यक्तीच्या अभिनव प्रयोगाने चकित रामाराव यांनी स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर ट्रेडमिलचा व्हिडिओ रीट्विट केला आहे. त्यांनी राज्याचे प्रोटोटाइप सेंटर, टी-वर्क्सनाही एका नोटसह टॅग केले आहे. तसेच त्यांना या व्यक्तीला स्वतःशी जोडण्याचा आणि अशाप्रकारच्या लाकडी ट्रेडमिलच्या निर्मितीत मदत करण्याची सूचना केली आहे.
अरुण भगवथुला यांनी एक व्हिडिओ शेअर करत ‘अद्भूत ट्रेडमिल जो विजेशिवाय काम करू शकतो’ असे नमूद केले होते. या व्हिडिओतील व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही. 45 सेकंदांच्या या व्हिडिओला 1 लाख 36 हजाराहून अधिक ह्यूज मिळाले आहेत.
ट्रेडमिल निर्मितीसाठी स्वतःच्या कौशल्याचा वापर करताना यात एक व्यक्ती दिसून येतो. ट्रेडमिल कशाप्रकारे काम करतो, हे दाखविले गेले आहे. व्हायरल झाल्यापासूनच सोशल मीडिया युजर्स त्याचे कौशल्य आणि नवोन्मेषी विचाराने प्रभावित झाले आहेत.