लस लवकर आणण्यासाठी दबाव नको
जगभरातील अनेक तज्ञांची सूचना, तीनशेहून अधिक प्रयोगशाळांमध्ये प्रयत्नांची पराका÷ा, अनेक पैलूंचा विचार आवश्यक
कोरोना विषाणूच्या जगाभरातील उदेकामुळे या विषाणूवरील लस किंवा औषध लवकरात लवकर उपलब्ध व्हावे, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा आहे. तथापि, त्यासाठी दबाव आणणे चुकीचे आहे, असे आवाहन जगभरातील अनेक विषाणूतज्ञांनी केले आहे. पुरेशी परीक्षणे न करता लस उत्पादित केल्यास तिचे दीर्घकालीन वाईट परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे.
तीनशेहून अधिक ठिकाणी प्रयोग
सध्या जगात तीनशेहून अधिक प्रयोगशाळांमध्ये कोरोनावरील लस तसेच औषध शोधण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले जात आहेत. कित्येक प्रयोगशाळांमध्ये तीन-तीन शिफ्ट्समध्ये काम होत आहे. तथापि, अद्यापही विश्वासार्ह प्रगती झालेली नाही. काही प्रयोगशाळांनी मानवावर प्रयोग करण्याइतपत प्रगती केली असली तरी लस तयार करणे, तिचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणे आणि जगभरात वितरण करणे या तिन्ही बाबी आव्हानात्मक आहेत. एक लस तयार करण्यासाठी साधारणतः आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. तथापि, कोरोनावर अनेक वैद्यकीय तज्ञांनी पूर्ण लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यावरील लस यापेक्षा बऱयाच कमी वेळात उपलब्ध होऊ शकते. तथापि, लसीचे लघुकालीन आणि दीर्घकालीन इतर परिणामही लक्षात घ्यावे लागतात. ते न घेता गडबडीने लस किंवा औषधाचे उत्पादन केल्यास गंभीर परिणाम निपजू शकतात, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
घाईगडबड नको
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी लसीवर प्रयोग सुरू आहेत. हा विषाणू नवीन असल्याने त्याची लस शोधण्यासाठी प्रारंभापासून प्रयत्न करावे लागत आहेत. जुन्या आणि कालबाहय़ ठरलेल्या औषधांवरही नव्याने प्रयोग सुरू आहेत. या औषधांच्या अणुरचनेमध्ये काहीसा बदल करून कोरोनावर उपाय शोधण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. तथापि, या सर्व प्रयत्नांना एक मर्यादा असून ती ओलांडण्याची गडबड करणे अंतिमत: हानीकारक ठरू शकते. त्यामुळे संशोधकांना त्यांच्या पद्धतीप्रमाणे आणि त्यांच्या गतीनुसार काम करण्याची मुभा जगभरातील देशांच्या सरकारांनी आणि जनतेनेही द्यावयास हवी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिकेत 37 हजाराची वाढ
वॉशिंग्टन :
अमेरिकेमध्ये गुरुवार ते शुक्रवार या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 37 हजार 102 ने वाढली आहे. ही गेल्या दोन महिन्यातील एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क आदी अधिक लोकवस्तीच्या प्रांतांमध्ये कोरोनाची वाढ झपाटय़ाने होत आहे. अमेरिकेची उपचार यंत्रणा वाढविण्याचे प्रयत्न प्रत्येक प्रांतीय सरकारांकडून सुरू आहेत. एकंदर रुग्णसंख्या 20 लाखांहून अधिक झाली असून मृतांची संख्या 1 लाखाहून अधिक आहे. अमेरिकेत कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचप्रमाणे परिणामकारक औषध शोधण्यासाठीही संशोधकांची पराका÷ा सुरू आहे.
पावणेतीन हजार वाढले
इस्लामाबाद :
पाकिस्तानात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी रुग्णसंख्येत 2 हजार 775 ची वाढ झाली आहे. तसेच 59 लोकांचा मृत्यू झाला आहे. या देशात एकंदर कोरोना मृतांची संख्या 3 हजार 962 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत 84 हजार 168 रुग्ण बरेही झाले आहेत. सिंध प्रांतात सर्वाधिक 75 हजार 168 रुग्ण सापडले असून पंजाब प्रांतात 71 हजार 987 अशी संख्या आहे. पाकिस्तानात 11 लाख 93 हजार चाचण्या झाल्या असल्या तरी हे प्रमाण लोकसंख्येच्या मानाने जगातील अत्यल्प आहे. पाकिस्तान आकडे लपवत असल्याचाही आरोप तेथील प्रसारमाध्यमे करीत आहेत.
स्थिती नियंत्रणात
सिंगापूर : जून महिन्याच्या प्रारंभी झालेल्या उदेकानंतर आता सिंगापूरमधील परिस्थिती आटोक्मयात असल्याचे तेथील प्रशासनाने घोषित केले आहे. गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्या वाढीचा वेग गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत सर्वात कमी होता. सिंगापूरमधील रुग्ण प्रामुख्याने विदेशातून आलेले स्थलांतरित असून त्यांना सिंगापूरच्या मूळ नागरिकांपासून वेगळे ठेवण्यात आल्याने विषाणूचा प्रसार आटोक्मयात राहिल्याचे तेथील प्रशासनाचे मत आहे. सध्या तेथे 2 हजार 115 रुग्ण उपचार घेत असून त्यातील 95 टक्के बरे होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधानांचा विवाह लांबणीवर
डेन्मार्क :
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे प्रेडरिकसन यांनी देशातील कोरोना उदेकामुळे स्वतःचाही विवाहही लांबणीवर टाकला आहे. त्या 29 वर्षांच्या आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. यावषी विवाह करण्याची त्यांची योजना होती. तथापि, कोरोनाच्या उद्रेकामुळे प्रशासनाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी त्यांनी संसार थाटण्याची योजना पुढे ढकलली. डेन्मार्कमध्ये कोरोनाचे 12 हजार 836 रुग्ण असून 603 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. युरोपातील इतर देशांच्या तुलनेत या देशाने कोरोनावर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविले असले तरी दुसऱया लाटेचा धोका अद्यापही आहे.
विनामूल्य चाचणी
कॅनबेरा :
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांताच्या प्रशासनाने प्रांतातील सर्व नागरिकांची विनामूल्य कोरोना चाचणी करण्याची योजना घोषित केली आहे. यासाठी 2 हजाराहून अधिक चाचणी केंदे स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर मेलबोर्न येथे 25 जूनपासून चाचणी मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. व्हिक्टोरिया प्रांतात पुढील दहा दिवस चाचणी मोहीम सुरू राहणार आहे. ऑस्ट्रेलियातील रुग्णवाढीचा आलेख आता सपाट होत असून ही स्थिती अशीच कायम रहावी, अशी अपेक्षा पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्यक्त केली आहे.
स्टॅटिन परिणामकारक
बीजिंग :
कोरोना रोखण्यासाठी स्टॅटिनयुक्त औषधे परिणामकारक ठरतात, असे चिनी संशोधकांना आढळून आले आहे. तथापि, या औषधांचे साईडइफेक्ट असल्यामुळे त्यांचा उपयोग किती प्रमाणात करावा, यावर तज्ञांमध्ये मतभेद आहेत. चीनमधील काही रुग्णालयांमध्ये स्टॅटिनयुक्त औषधांचा प्रयोग रुग्णांवर करण्यात आला. त्याचा अनेकांना लाभ झाल्याचे सांगण्यात आले. स्टॅटिनयुक्त औषधे इतर अनेक विकारांवर उपयोगात आणली जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज त्यांचा उपयोग करणे धोकादायक ठरू शकते, असेही चिनी तज्ञांचे म्हणणे आहे. चीनमध्ये गेल्या दोन दिवसांत 29 नवे रुग्ण आढळले आहेत.