लवकरच 40 हजारहून अधिक शिक्षकांची भरती
शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांची माहिती : 5,500 क्रीडा शिक्षकांच्याही होणार नेमणुका
प्रतिनिधी, वार्ताहर/बेंगळूर
राज्यातील विविध सरकारी शाळांमध्ये शिक्षक, क्रीडा शिक्षकांची कमतरता आहे. या पदांची भरती केली जाईल. राज्यातील सरकारी शाळांमध्ये 5,500 क्रीडा शिक्षक आणि 40 हजारहून अधिक शिक्षकांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी दिली.
शिमोगा येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील सरकारी शाळांमध्ये 5,500 क्रीडा शिक्षकांची कमतरता आहे. त्याचप्रमाणे 40 हजारांहून अधिक शिक्षकांची कमतरता आहे. अर्थखात्याची परवानगी घेऊन या पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाईल. शिवाय राज्यात 1.80 लाख मुलांना नाचण्याचे आंबिल देण्याची योजना पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेड उपयुक्त आहेत. त्यामुळे मुलांनी अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमांमध्येही सक्रियपणे सहभागी होणे गरजेचे आहे. मुलांमधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना संधी देण्याकरिता सरकार आणि स्थानिकांचेही प्रोत्साहन आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
31 डिसेंबरपूर्वी शाळांना डेस्क, टेबल, खुर्च्या
राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये टेबल, खुर्च्या, डेस्कची कमतरता आहे. 31 डिसेंबर 2024 पूर्वी या वस्तू पुरविण्यात येईल. पुढील वर्षाच्या 31 डिसेंबरपूर्वी राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील मुलांना आवश्यक सुविधा पुरविल्या जातील. ही मुले जमिनीवर बसू नयेत, यासाठी त्यांना डेस्कचे वितरण करण्यात येणार असे त्यांनी सांगितले.
यंदा पाच हजार शिक्षक होणार निवृत्त
चालू शैक्षणिक वर्षात 4985 शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. ही पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाने स्वारस्य दाखवले आहे. मागील सरकारच्या काळात (2022-23), सरकारी उच्च प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या 15 हजार पदवीधर प्राथमिक शिक्षक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यापैकी 13,352 पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली आणि न्यायालयीन प्रकरणे वगळून एकूण 12415 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्षात आणखी पाच हजार शिक्षकांची कमतरता भासणार आहे.
अतिथी शिक्षकांवर भिस्त
विविध कारणांमुळे शिक्षक नियुक्ती करणे ही सोपी प्रक्रिया नाही. त्यामुळे रिक्त जागा भरेपर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठी अतिथी शिक्षकांचा वापर करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. सध्याच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी चालू वर्षातील रिक्त पदांवर एकूण 35,192 अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांवर 7808 अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने शिक्षकांची कमतरता दूर करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
इंग्रजी, विज्ञान विषय शिक्षकांची समस्या
सध्याच्या परिस्थितीत इंग्रजी आणि विज्ञान विषयांच्या शिक्षक नेमणुकीला अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. मात्र, शिक्षकांची उपलब्धता अपेक्षेप्रमाणे नाही. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये 2127 इंग्रजी आणि 6934 विज्ञान शिक्षकांची कमतरता असल्याचे शिक्षण खात्याकडून सांगण्यात आले आहे.