लक्ष्य सेन, सात्विकसाईराज-चिराग शेट्टी अजिंक्य
सिंगापूरच्या लोह कीन यू याला धक्का तर इंडोनेशियन जोडी भारतीय जोडीकडून पराभूत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने कारकिर्दीत पहिले सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावताना येथे झालेल्या योनेक्स सनराईज इंडिया ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले. पुरुष दुहेरीतही सात्विकसाईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनी भारतातील प्रमुख स्पर्धा जिंकणारी पहिली जोडी होण्याचा मान मिळविताना इंडोनेशियन जोडीला धक्का दिला.
लक्ष्य सेनने विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन सिंगापूरच्या लोह कीन यू याला 24-22, 21-17 असा पराभवाचा धक्का दिला. 20 वर्षीय सेनने गेल्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिले पदक जिंकळताना कांस्य तर लोहने सुवर्णपदक मिळविले होते. सेनने अंतिम लढतीत चमकदार प्रदर्शन करीत पाचव्या मानांकित लोहवर 54 मिनिटांत विजय मिळविला. सेन व लोह यांच्यात आतापर्यंत चार लढती झाल्या होत्या आणि दोघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले होते. मात्र गेल्या तीन लढतीत सेन लोहकडून दोनदा पराभूत झाला होता. येथील लढतीत मात्र सेनने चपळतेने खेळत आक्रमक फटक्यांचा परिणामकारक वापर केला. सेनचे हे आजवरचे सर्वात मोठे यश असून यापूर्वी त्याने दोन सुपर 100 स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यात डच ओपन व सारलॉरलक्स ओपन यांचा समावेश आहे. याशिवाय 2019 मध्ये बेल्जियम, स्कॉटलंड, बांगलादेश येथील आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धाही जिंकल्या आहेत. त्यानंतर कोरोनाच्या प्रकोपामुळे त्याच्या घोडदौडीला ब्रेक लागला होता. गेल्या वर्षी त्याने हायलो स्पध्sा&त उपांत्य फेरी गाठली तर वर्ल्ड टूर फायनल्समध्ये प्रथमच खेळताना बाद फेरीपर्यंत मजल मारली होती आणि त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळविण्याचा पराक्रम केला.
सात्विकसाईराज-चिरागचा अव्वल जोडीला धक्का
सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी अंतिम फेरीत तीनदा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद मिळविलेल्या मोहम्मद एहसान व हेंद्रा सेतियावन या जागतिक द्वितीय मानांकित इंडोनेशियन जोडीवर 21-16, 26-24 अशी 43 मिनिटांत मात केली. भारतातील ही मोठी स्पर्धा जिंकणारी सात्विकसाईराज व चिराग ही पहिली भारतीय जोडी बनली आहे. या लढतीत उतरण्यापूर्वी सात्विक-चिराग व इंडोनेशियन जोडी यांच्यात चारवेळा गाठ पडली होती. त्यापैकी तीन वेळा सात्विक-चिराग यांना पराभव स्वीकारावा लागला होता व एक लढत जिंकली होती. पण येथे त्यांचे कडवे आव्हान मोडून काढत शानदार विजय मिळवित अजिंक्यपद पटकावले. विशेष म्हणजे चुकीची कोरोना चाचणी झाल्याने त्यांना ही स्पर्धा हुकणार होती. त्यातून सावरत त्यांनी जेतेपद पटकावण्यापर्यंत झेप घेतली.
सात्विक-चिराग यांच्यासाठी या वर्षाची ही शानदार सुरुवात झाली आहे. जेतेपदाबरोबरच त्यांना महत्त्वाचे मानांकन गुणही मिळाले आहेत. यावर्षी त्यांचा भरगच्च कार्यक्रम असून राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धा या दोन महत्त्वाचा स्पर्धांचा त्यात समावेश आहे.
भारतीय जोडीने अंतिम लढतीत सकारात्मक सुरुवात केली. इंडोनेशियन जोडीने नंतर मुसंडी मारली तरी ब्रेकवेळी भारतीय जोडीनेच 2 गुणांची आघाडी घेतली होती. भारतीय जोडीने त्यांना रॅलीजमध्ये गुंतवून ठेवत 18-13 अशी आघाडी घेतली. पण इंडोनेशियन जोडीने ही आघाडी 16-18 अशी कमी केली तरी सात्विक-चिरागने हा गेम जिंकत आघाडी घेतली.
दुसऱया गेममध्ये वेगवान व छोटय़ा रॅलीजवर दोघांनी भर दिल्याचे पहावयास मिळाले. एहसान-सेतियावन यांनी 9-6 अशी तीन गुणांची आघाडी घेतल्यानंतर सात्विक-चिराग यांनी बेकपर्यंत 11-10 अशी आघाडी मिळेल, याची दक्षता घेतली. ब्रेकनंतरही सात्विक-चिराग यांनी जोम कायम ठेवत 15-13 अशी आघाडी वाढवली. पण इंडोनेशियन जोडीने त्यांना 17-17 वर गाठले. एहसाने नेटजवळ चूक केल्यानंतर भारतीय जोडी 19-17 अशी पुढे गेली. पण प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना 19-19 वर पुन्हा गाठत नंतर गेमपॉईंटपर्यंत मजल मारली. मात्र दोन्ही जोडय़ांनी आपल्याला मिळालेल्या ऍडव्हांटेजच्या संधी वाया घालविल्या. अतियश संघर्षानंतर इंडोनेशियन जोडीने पाच गेमपॉईंट वाया घालविल्यावर सात्विक-चिराग जोडीने जेतेपद निश्चित केले.
सात्विक-चिराग यांनी 2019 मध्ये थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धा जिंकली होती. त्याच वर्षी प्रेंच ओपन सुपर 750 स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्य मिळविले तर हैदराबाद ओपन सुपर 100 स्पर्धेचे अजिंक्यपदही मिळविले. त्याआधी 2018 मध्ये सईद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी उपविजेतेपद मिळविले होते. टोकियो ऑलिम्पिकसाठीही ते पात्र ठरले होते, पण साखळी फेरीच्या पुढे ते जाऊ शकले नव्हते.